छत्रपती संभाजीनगर: अंमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवादात त्यांचे बँक खाते वापरल्याचा बनावट दावा करत सायबर गुन्हेगारांनी एका सेवानिवृत्त उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्याला तब्बल ३० लाख ४० हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कसा घातला गंडा?
विश्वनाथ राजाळे (वय ६१, रा. एन-७) हे २०२० मध्ये अतिरिक्त उद्योग संचालक पदावरून सेवानिवृत्त झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांना एका कुरिअर कंपनीच्या नावे फोन आला. त्यानंतर, त्यांना सीबीआयच्या बनावट लोगोची कागदपत्रे पाठवून संपर्क साधण्यात आला.
सायबर गुन्हेगारांनी राजाळे यांच्या तीन बँक खात्यांचा वापर अंमली पदार्थ तस्करी आणि दहशतवादी कारवायांसाठी झाल्याचा आरोप केला. याचा तपास करण्याच्या बहाण्याने स्काईपद्वारे व्हिडिओ कॉल सुरू केला.
व्हिडिओ कॉलदरम्यान, गुन्हेगारांनी बनावट पोलिस अधिकारी नरेश गुप्ता बॅनर्जी यांचे ओळखपत्र पाठवले. तसेच, बलसिंग राजपूत नावाच्या व्यक्तीने पोलिस उपायुक्त असल्याचा दावा करत एका नेत्याला अटक केल्याचे छायाचित्र पाठवले.
सायबर गुन्हेगारांची व्यूहरचना
राजाळे यांना आठ वेगवेगळ्या क्रमांकांवरून फोन करण्यात आले. व्हिडिओ कॉलमध्ये पोलिस मुख्यालयासारखे दालन आणि पोलिसांचे चिन्ह वापरण्यात आले. बँक व्यवहाराची तपासणी करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून एका एसबीआय खात्यावर ३० लाख ४० हजार रुपये वळवण्यात आले. तपासात हे खाते गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील नानपुराचे असल्याचे निष्पन्न झाले.
कुटुंबापासून वेगळे ठेवले
गुन्हेगारांनी राजाळे यांनी कुटुंबीयांना काही सांगू नये म्हणून त्यांना धमकावत हॉटेलमध्ये वास्तव्य करण्यास भाग पाडले. तब्बल सहा दिवस ते डिजिटल अरेस्टमध्ये राहिले. शेवटी सहाव्या दिवशी त्यांना आपल्या फसवणुकीची जाणीव झाली आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
सध्या सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याचा तपास सुरू असून सायबर गुन्हेगारांचा माग काढण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी अशा बनावट कॉल्सला बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*