गजानन राऊत : प्रतिनिधी / छत्रपती संभाजीनगर : सिडको वाळूज महानगरातील साईनगर वसाहतीत मध्यरात्री अज्ञात माथेफिरूने दोन दुचाकींना पेटवून दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाईट गाऊन परिधान करून आलेल्या या माथेफिरूने दुचाकींना आग लावून घटनास्थळावरून पलायन केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे.
ही घटना गुरुवारी रात्री २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. संजय बाबुराव मारजवाडे यांच्या घरासमोर उभी असलेली होंडा शाईन (MH 20 GH 7690) व शेजारी राहणारे प्रशांत बनसोडे यांच्या एक्टिवा स्कुटी (MH 20 FW 7854) या दुचाकींना माथेफिरूने जाळून टाकले. दुचाकी पेट घेताच आगीच्या झोताने घराबाहेर असलेले इलेक्ट्रिक मीटरही जळून खाक झाले. मात्र, मारजवाडे कुटुंब वेळीच जागे झाल्याने मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाथरकर व पोलीस शिपाई यशवंत गोबाडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला.
पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी – रहिवाशांची मागणी
या घटनेमुळे साईनगर वसाहतीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तालुका संघटक अनिता पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन मारजवाडे कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. तसेच, या माथेफिरूला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली.
सध्या पोलीस अज्ञात माथेफिरूचा शोध घेत असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*
