छत्रपती संभाजीनगर : शहरातील नवाबपुरा भागात एका रिअल इस्टेट व्यावसायिकावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (२६ मार्च) पहाटे घडली. आरोपीने व्यावसायिकाच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. मात्र, सुदैवाने तो थोडक्यात बचावला. एका गोळीने त्याच्या डोक्यावरील टोपीला स्पर्श केला, तर दुसरी गोळी मोपेडला लागली.
फिर्यादी हसीब मोहम्मद सलीम काझी (वय ३३, रा. जालीवाली मस्जिदजवळ, नवाबपुरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रोजा असल्याने ते पहाटे चारच्या सुमारास डेअरीवर दूध आणि खारी घेण्यासाठी मोपेडवरून घराबाहेर पडले. काही अंतर गेल्यानंतर अचानक फटाक्यासारखा आवाज आला. टायर फुटला असेल असा संशय आल्याने त्यांनी मोपेड थांबवली. त्याचवेळी समोरून सडपातळ शरीरयष्टीचा सहा फूट उंचीचा अज्ञात व्यक्ती आला आणि शिवीगाळ करत हसीब यांच्या दिशेने गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या टोपीजवळून गेली. घाबरून त्यांनी तात्काळ मोपेड सुरू करून घराकडे धूम ठोकली आणि मित्र शहाबाज खान याला फोन करून घटनेची माहिती दिली.
भाडेकरूवर संशय
हसीब यांनी जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यांनी आपल्या एका भाडेकरूवर संशय व्यक्त केला आहे. हा भाडेकरू यापूर्वीही त्यांच्या विरोधात गुन्ह्यात अडकला होता. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
मोपेडला गोळी लागून छिद्र; पोलिसांचा तपास सुरू
गोळीबाराच्या घटनेत हसीब यांच्या मोपेडला गोळी लागल्याने त्यात छिद्र पडले आहे. पोलिसांनी ही गोळी जप्त केली आहे. पहाटे या भागात लाईट नसल्याने परिसर अंधारात होता. गोळी झाडणाऱ्या व्यक्तीने तोंडाला रुमाल बांधला होता, असे हसीब यांनी सांगितले.
घटनास्थळी डीसीपी प्रशांत स्वामी, एसीपी सुदर्शन पाटील, जिन्सी पोलिस ठाण्याचे ठाणेदार गणेश ताठे, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक विनायक शेळके, उपनिरीक्षक संदीप सोळंके, विशाल बोडखे, रविकिरण कदम आणि तपास अधिकारी उपनिरीक्षक साळवे यांनी भेट देऊन तपास सुरू केला. तसेच फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*