सिल्लोड : शहरात माणुसकीला काळीमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. दत्तक घेतलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा तिच्याच आई-वडिलांनी अमानुषपणे अंगावर चटके देऊन आणि डोक्यात टणक वस्तू मारून खून केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने संपूर्ण सिल्लोड शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
मृत चिमुकलीचे नाव आयात शेख फहिम असे असून, तिला जवळपास सहा महिने आधी शेख फहिम शेख अय्युब आणि त्याची पत्नी फौजिया शेख फहिम या पती-पत्नीने दत्तक घेतले होते. आरोपी पती-पत्नी मूळचे अजिंठा येथील रहिवासी असून, सध्या सिल्लोड शहरातील मोगलपुरा भागात वास्तव्यास होते. त्यांच्या चार मुलांव्यतिरिक्त मुलगी हवी होती म्हणून त्यांनी जालना येथील रहिवासी शेख नसीम अब्दुल कय्युम याच्याकडून आयातला दत्तक घेतले होते.
मात्र, बुधवारी रात्री या निर्दयी आई-वडिलांनी संगनमत करून निष्पाप आयातला अमानुष मारहाण केली. अंगावर गरम वस्तूंनी चटके दिले आणि डोक्यात टणक वस्तू मारून तिचा जीव घेतला. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी पती-पत्नीला अटक केली आहे.
मुलीचा खून का केला? अजूनही गूढ कायम!
पोलिस तपासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपी शेख फहिम याने कबूल केले की, त्याने आयातला पाच हजार रुपयांत खरेदी केले होते! यामध्ये जाफराबाद येथील एका इसमाने मध्यस्थी केली होती आणि मुलीला विकत घेतल्याचे लेखी पुरावे देखील त्याच्याकडे असल्याचे त्याने सांगितले. मात्र, एवढ्या प्रेमाने दत्तक घेतलेल्या निष्पाप चिमुकलीचा त्यांनी इतक्या क्रूरपणे जीव का घेतला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिस तपास सुरू
या प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबू मुंढे करीत आहेत. पोलीस लवकरच या क्रूर घटनेमागील सत्य बाहेर काढतील, अशी शक्यता आहे.
या अमानुष घटनेने संपूर्ण सिल्लोड शहर हादरले असून, समाजात माणुसकी किती खालच्या थराला गेली आहे, याचे हे जिवंत उदाहरण आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*