छत्रपती संभाजीनगर : शहरात रिक्षा भाडे देण्यावरून झालेल्या वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. डीएडची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याचा रिक्षा चालकाने चाकूने भोसकून खून केल्याची घटना नगर नाका येथील आयकर कार्यालयाजवळ घडली. मयत परीक्षार्थ्याचे नाव जयराम बबन पिंपळे (वय २८, रा. श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर) असे आहे.
ही घटना ४ जून रोजी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयराम पिंपळे हे डीएडची परीक्षा देण्यासाठी अहिल्यानगरहून छत्रपती संभाजीनगर येथे आला होता. त्याचे परीक्षा केंद्र वाळुंज येथे असल्याने त्यांनी बाबा पेट्रोल पंपजवळून रिक्षा केली. भाडे देण्यावरून त्याची रिक्षाचालकासोबत वादावादी झाली आणि वाद हाणामारीत बदलला. या झटापटीत रिक्षा चालकाने चाकूने त्याच्या पोटावर वार केला. जखमी अवस्थेत जयरामने रिक्षेची चावी काढून घेऊन स्वतःला वाचवण्यासाठी पळत जाऊन पुन्हा दुसरी रिक्षा करून रुग्णालय गाठले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच छावणी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेज आणि वाहतूक शाखेच्या मदतीने रिक्षा क्रमांक शोधून काढत, आरटीओ विभागाकडून माहिती घेऊन संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परीक्षार्थी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रस्त्यावर होणारी हिंसा थांबवण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*