छत्रपती संभाजीनगर : महावितरणच्या निष्काळजीपणामुळे चिकलठाणा परिसरातील दोन निष्पाप ग्रामस्थांना आपला जीव गमवावा लागला. वादळात वाकलेल्या हायटेंशनच्या पोलवरील तारा जमिनीपर्यंत लोंबकळत असतानाही महावितरणने कोणतीही कारवाई न केल्यामुळे कचरू जनार्धन दहिहंडे आणि किरण जगनाथ दहिहंडे यांचा विजेच्या तारेचा शॉक लागून मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी जालना रोडवर ठिय्या दिला आणि तणाव निर्माण झाला.
दहा दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यामुळे चिकलठाणा रेल्वे स्टेशनजवळील हायटेंशनच्या पोलवरील तारा जमिनीपर्यंत पोहोचल्या होत्या. स्थानिक शेतकऱ्यांनी वारंवार तक्रार करूनही महावितरणने दुरुस्ती केली नाही. सोमवारी (दि. १६) सायंकाळी दहिहंडे काका-पुतण्या शेतीकाम करत असताना या तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन तास मृतदेह शेतातच पडून होते. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह घाटी रुग्णालयात हलवले. मात्र, संतप्त नातेवाईकांनी मृतदेह गावात आणले आणि जालना रोडवर रास्ता रोको करत महावितरणच्या निष्क्रियतेचा निषेध केला.
सदर लाईन डमी असल्याचा दावा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे यांनी याची चौकशी सुरू असून विद्युत प्रवाह कसा गेला याचा तपास सुरु असल्याचे सांगितले.
दरम्यान, गावकऱ्यांनी दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, मृतक कुटुंबीयांना तात्काळ मदत मिळावी आणि पोलिस आयुक्त व जिल्हाधिकारी घटनास्थळी यावेत अशी मागणी करत मृतदेह हालविण्यास नकार दिला. डीसीपी प्रशांत स्वामी, तहसीलदार डॉ. परेश चौधरी, एसीपी सुदर्शन पाटील यांनी मध्यरात्रीपर्यंत ग्रामस्थांशी चर्चा केली. शेवटी कारवाईचे आश्वासन दिल्यावर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
या घटनेने महावितरणच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ग्रामस्थांच्या सततच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे आणि वेळेवर उपाय न करणं, याचे दुर्दैवी परिणाम दोन कुटुंबांवर झाले आहेत. आता दोषींवर कडक कारवाई होईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*