छत्रपती संभाजीनगर : शहरातील पडेगाव-मिटमिटा परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एटीएम सेंटरमध्ये चोरट्यांनी शटर बंद करून गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडले आणि दोन ते तीन लाख रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली असून सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणा झोपेत असल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होत आहे.
सदर प्रकरणी छावणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांनी माहिती दिली की, बँकेकडून दुपारी पोलिसांना एटीएम फोडल्याची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे, मुंबईतील बँकेच्या नियंत्रण कक्षामध्ये सेंसर किंवा सायरन वाजलेच नाहीत. त्यामुळे चोरी होत असताना बँकेला आणि पोलिसांना याचा अंदाजच आला नाही.
चोरट्यांनी व्यवस्थितपणे शटर बंद करून, कोणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने एटीएम फोडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यामध्ये वापरलेला गॅस कटर आणि इतर साधनांची तपासणी करण्यात येत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, एटीएम मशीनच्या देखरेखीसाठी असलेल्या कंपनीचे अधिकारी सध्या नांदेड येथे एका दुसऱ्या एटीएम फोडीच्या प्रकरणात आहेत. त्यामुळे त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याचे समजते. पोलिसांकडून तपास सुरू असून, लवकरच चोरट्यांचा छडा लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*