छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडीतील स्मशानभूमीसमोर गुरुवारी (१९ जून) रात्री आठच्या सुमारास भीषण प्रकार घडला. कुरेशी चिकन शॉपवरील कामगार मस्तान कुरेशी ऊर्फ नन्ना (वय २५) याने मांस कापण्याच्या सुऱ्याने तिघांवर सपासप वार केले. या हल्ल्यात नितीन सोनाजी संकपाळ (वय ३५, रा. राजनगर, मुकुंदवाडी) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा भाऊ सचिन संकपाळ (वय ३२) व मित्र दत्ता बालाजी जाधव (रा. राजनगर) हे गंभीर जखमी झाले. सध्या दोघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लघुशंकेवरून वाद, आणि नंतर थेट हल्ला
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून आलेला सचिन, त्याचा भाऊ नितीन व मित्र दत्ता हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. अर्ध्या जेवणानंतर नितीन लघुशंकेसाठी कुरेशी चिकन शॉपच्या मागे गेला, तेव्हा तिथे उपस्थित मस्तानचा मित्र समीर शेख (रा. मिसारवाडी) याने त्याला शिवीगाळ करत हटकले. काही वेळात मस्तान कुरेशी घटनास्थळी पोहचला आणि त्यानेही शिवीगाळ करत खुनाची धमकी दिली. वाद अधिक वाढला आणि अचानक मस्तानने दुकानातून मांस कापण्याचा सुरा आणून तिघांवर हल्ला केला.
नितीनच्या डोक्यावर आणि छातीच्या डाव्या बाजूला खोल जखमा झाल्याने तो जागीच कोसळला. मस्तानने नंतर सचिन आणि दत्तावरही वार करून पळ काढला.
जखमींना रुग्णालयात नेताना वाहनचालक मदत करण्यास तयार नव्हते, नागरिकांनी विनवण्या केल्या तरी कोणीही थांबले नाही. या विलंबामुळे नितीनला मिनी घाटी रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.
हल्ल्यानंतर मस्तान कुरेशीने घरातील मोबाइल बंद करून पलायनाची तयारी केली होती, मात्र मध्यरात्री पोलिसांनी त्याला अटक केली. काही दिवसांपूर्वीच त्याने साई टेकडी परिसरात नवीन घर घेतले होते. मस्तानविरोधात यापूर्वीही मारहाणीचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्याचा साथीदार समीर शेख यालाही रात्री उशिरा मिसारवाडीतून अटक करण्यात आली.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
नितीन आणि सचिन यांचे वडील लहानपणीच वारले होते. त्यांच्या आईनेच दोघांनाही मोठं केलं. नितीनची सिडको बसस्थानकाजवळ अंडा-ऑम्लेट व चहाची गाडी होती, तर सचिन पुण्यात लिफ्ट मेंटेनन्सचे काम करत होता. दोघेही विवाहित असून, नितीनला दीड वर्षाचा मुलगा आणि सहा वर्षांची मुलगी आहे. त्यांची आई पुण्याला असल्याने तिला फक्त “अपघात” झाल्याचे सांगून बोलावण्यात आले, तर पत्नीलाही घटनेबाबत लगेच माहिती देण्यात आली नव्हती.
पोलिस तपास सुरू
घटनेनंतर मुकुंदवाडी परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*