छत्रपती संभाजीनगरमध्ये भरदिवसातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, जवाहरनगरनंतर आता गारखेडा भागातील भगतसिंहनगरमध्ये चोरट्यांनी दुपारीच फ्लॅट फोडून सुमारे १५.१ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी ही घटना उघडकीस आली असून पुंडलिकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
स्नेहल अमोल देवाळे या भगतसिंहनगरमधील साई सुमन अपार्टमेंटमध्ये कुटुंबासह राहतात. घटनेच्या दिवशी त्या कामावर होत्या, तर त्यांचा मुलगा शाळेत गेला होता. सायंकाळी दोघे घरी परतल्यानंतर दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला दिसला. घरात पाहणी केली असता कपाटातील सगळं साहित्य अस्ताव्यस्त होतं आणि ड्रॉवरमधून सुमारे १५.१ तोळ्यांचे ११ प्रकारचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले.
घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केली. चौकशीतून असे समोर आले आहे की चोरट्यांनी दुपारी २ ते ५ या वेळेत घरफोडी केली. विशेष म्हणजे चोरट्यांनी फक्त दागिने असलेल्या कपाटाचाच अंदाज घेत थेट तिथेच हात साफ केला. यावरून चोरट्यांकडून अपार्टमेंटची पूर्वीच रेकी करण्यात आली असल्याचा अंदाज आहे.
घटनेच्या वेळी अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते, तर मुख्य दरवाजावर लॅच लॉकही नव्हता. त्यामुळे चोरट्यांनी सहजपणे कडीकोंडा तोडत घरात प्रवेश मिळवला. यापूर्वी १६ जून रोजी जवाहरनगरमध्येही भरदिवसा १५ तोळ्यांचे दागिने चोरीला गेले होते. सलग दोन घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे आणि सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KOOzOvmJm8UAlKfzgNGy49
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*