छत्रपती संभाजीनगर : कारचा दरवाजा लॉक न करताच फक्त काही मिनिटांसाठी मोमोज खाण्यासाठी गेलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कर्मचाऱ्याला २० लाख रुपयांचा फटका बसला. चोरट्यांनी क्षणार्धात कारमधून रोख रक्कम असलेली बॅग लंपास केली. ही धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी हडकोतील डी मार्ट मॉलसमोर घडली.

वहालबाबू सत्यम कुरपुरोल (पद – अकाउंटंट) हे मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत कार्यरत आहेत. २६ जून रोजी सायंकाळी प्रकल्प समन्वयक आनंदराव यांच्या आदेशानुसार, त्यांनी कंपनीची २० लाख रुपयांची रोख रक्कम जालना येथील कार्यालयात पोहोचवण्याची जबाबदारी स्वीकारली. ते दिल्ली गेट मार्गे हर्सूल टी पॉइंटकडे निघाले असताना, मधेच डी मार्टसमोरील मोमोज हॉटेलजवळ थांबले.

वहालबाबूंनी पैशांची बॅग कारमध्येच ठेवली आणि दोन सहकाऱ्यांसह हॉटेलमध्ये गेले. परत आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की कारमधील बॅग गायब आहे. प्राथमिक तपासात चालकाने कार लॉक न केल्याची बाब समोर आली आहे. घटनास्थळी असलेल्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार, बॅग घेऊन जाणाऱ्या व्यक्तीने पांढरा शर्ट आणि टोपी परिधान केली होती.

या प्रकरणाचा तपास सिटी चौक पोलीस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. चोरी नियोजनबद्ध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. दरम्यान, इतक्या मोठ्या रकमेबाबत निष्काळजीपणामुळे सुरक्षेच्या पातळीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BQJO3GSQlZh881t2Q5PQXa?mode=r_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,738 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क