छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडे वेळ नाही, मात्र रमीच्या खेळातून तब्बल ९ हजार कोटी रुपयांचा कर गोळा होत आहे. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, मेंढपाळ, मच्छिमार आणि दिव्यांग यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मंत्रालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा दिला.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गुरुवारी अमरप्रित चौकात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रास्ता रोको आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते. पावसामुळे आंदोलनात व्यत्यय आल्याने क्रांतीचौकात आंदोलन करण्यात आले. दुपारी ४ वाजता बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व दिव्यांग कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. “कर्जमाफी आमची हक्काची, नाही कुणाची बापाची”, “दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळालेच पाहिजे”, “फडणवीस सरकार हाय हाय” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

 

यावेळी मार्गदर्शन करताना कडू म्हणाले, “हे आंदोलन कोणत्याही जाती-धर्माचे नाही. शेतकरी, मेंढपाळ, मच्छिमार आज सुरक्षित नाहीत. चराईसाठी जागा नाही, मच्छिमारांचा ठेका उद्योगपतींना दिला जात आहे. मात्र रमीचा धंदा तेजीत असून सरकार त्यातून अब्जावधींचा कर गोळा करत आहे. उद्योजकांचे पोट भरण्यात सरकार व्यस्त असून कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी कुठलाही ठोस निर्णय घेतला जात नाही.”

कडू यांनी कृषीमंत्री माणिक कोकाटे यांच्या भूमिकेवरही टीका केली. “मुख्यमंत्री फडणवीस यांचे सरकार उद्योजकांचे आहे, शेतकऱ्यांचे नाही. कोकाटे यांच्या राजीनाम्याची धमकही सरकार दाखवू शकत नाही. यंदा पीक चांगले आले म्हणून कर्जमाफीची गरज नाही, हा फडणवीसांचा युक्तिवाद हास्यास्पद आहे. त्यामुळे आता न सांगता मंत्रालयात घुसून आंदोलन छेडणार,” असा इशारा कडू यांनी दिला.

या आंदोलनावेळी पोलीसांनी कडू यांना ताब्यात घेऊन नंतर सुटका केली. या प्रसंगी मनसेचे प्रकाश महाजन, जिल्हाध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/FVG9etwDw0n6MyMqWmu8uz?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,011 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क