छत्रपती संभाजीनगर – घटस्फोटाचे प्रकरण घेऊन आलेल्या विवाहितेला लग्नाचे आणि शिक्षणाचे आमिष दाखवून एका वकिलाने दीर्घकाळ अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे, या वकिलाने पती-पत्नी असल्याचे भासवून पीडितेचा दोन वेळा गर्भपात घडवून आणला. मार्च ते ऑगस्ट २०२५ दरम्यान घडलेल्या या घटनेत ३ ऑगस्ट रोजी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीचे नाव महेंद्र भगवान नैनाव (३४, रा. नरहरी अपार्टमेंट, लक्ष्मी माता मंदिरासमोर, एन-६, सिडको) असे असून, पीडित २७ वर्षीय प्राची (नाव काल्पनिक) आहे. दोघेही जळगाव जिल्ह्यातील एकाच शाळेचे विद्यार्थी होते. महेंद्र हा प्राचीपेक्षा सिनिअर असल्याने पूर्वी केवळ तोंडओळख होती. २०१८ मध्ये प्राचीचे लग्न झाले असून, तिला सहा वर्षांचा मुलगा आहे. पतीसोबत सतत वाद होत असल्याने तिने पाचोरा येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

घटस्फोटाच्या सुनावणीसाठी ८ मार्च रोजी न्यायालयात गेलेल्या प्राचीची ओळख वकील महेंद्र नैनाव याच्याशी झाली. त्यानंतर त्यांच्यातील ओळख प्रेमसंबंधात बदलली. महेंद्रने तिला लग्नाचे तसेच एलएलबीचे शिक्षण पूर्ण करून देण्याचे आमिष दाखविले. कामानिमित्त प्राची जळगावमध्ये राहत असली तरी महेंद्र तिला छत्रपती संभाजीनगर येथे बोलवून घ्यायचा. टीव्ही सेंटर परिसरातील हॉटेलमध्ये नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचा.

यानंतर १२ जूनपासून दोघे जयभवानीनगर येथे एका भाड्याच्या खोलीत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहू लागले. या काळातही महेंद्रने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. पती-पत्नी असल्याचे सांगून त्याने माऊली बाल रुग्णालय आणि मॅटर्निटी होम येथे दोनवेळा गर्भपात करून घेतला. गर्भपातानंतर पीडिता मानसिकदृष्ट्या खचलेली असतानाही त्याने अत्याचार सुरूच ठेवले. विरोध केल्यास तिच्यावर मारहाण केली जात असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनुसार सिडको पोलिसांनी आरोपी वकिलाविरुद्ध बलात्कार, मारहाण, फसवणूक, जबरदस्तीने गर्भपात आणि संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे. या घटनेमुळे कायद्याचे रक्षण करणाऱ्या व्यक्तीकडूनच कायद्याचा गैरवापर झाल्याने कायदा व्यवसायातील नैतिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,853 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क