पैठण : जमिनीचे वाटणीपत्र करून देण्यासाठी ८ हजार रुपयांची लाच घेताना आपेगाव येथील तलाठी आणि कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई ४ ऑगस्ट रोजी पैठण तहसील कार्यालयात करण्यात आली. याप्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अटकेतील आरोपींमध्ये तलाठी अक्षय बबनराव बिनीवाले (३०, रा. पिरवाडी, ता. बदनापूर, जि. जालना, ह.मु. म्हाडा कॉलनी, पैठण) आणि कोतवाल सोमनाथ राघू कोल्हे (३६, रा. आपेगाव, ता. पैठण) यांचा समावेश आहे. एसीबीच्या पोलिस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांनी ही माहिती दिली.

तक्रारदार यांची नांदूर (ता. पैठण) शिवारातील गट क्रमांक ५८ मध्ये ५० गुंठे सामाईक जमीन असून त्यापैकी १६ गुंठे त्यांच्या नावे आहे. २५ जुलै रोजी वाटणीपत्र करण्यासाठी त्यांनी संबंधित कागदपत्रे कोतवाल कोल्हे यांच्याकडे दिली. १ ऑगस्ट रोजी विचारणा केल्यावर कोल्हे यांनी १० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने तत्काळ एसीबीकडे तक्रार नोंदवली.

४ ऑगस्ट रोजी एसीबीचे पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे, धर्मराज बांगर, अंमलदार राजेंद्र नंदिले, युवराज हिवराळे आणि सी.एन. बागुल यांनी पडताळणी केली असता कोल्हे यांनी ८ हजार रुपये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तहसील कार्यालयात सापळा रचून कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान कोल्हे यांनी तलाठी बिनीवाले यांच्याशी फोनवर आणि प्रत्यक्ष भेटीत चर्चा करून लाच घेण्याचे सांगितले. बिनीवाले यांनी संमती दर्शवल्यानंतर कोल्हे यांनी लाच स्वीकारली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहात पकडले.

त्यानंतर दुसऱ्या पथकाने तलाठी बिनीवाले यांच्या घराची झडती घेतली. झडतीत नेमके काय मिळाले, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. आरोपींच्या अंगझडतीतून मोबाईल जप्त करून त्याचा तपास सुरू असल्याचे एसीबी अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांनी सांगितले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,079 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क