छत्रपती संभाजीनगर : प्रेमाच्या नादात अंध झालेल्या १९ वर्षीय तरुणीने स्वतःच्या आईचे तब्बल ११ तोळे सोने आणि १ लाख ५५ हजार रुपये रोख रक्कम प्रियकराला दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शनिवारी (दि. ९) भारतनगर, एन-१३, हडको परिसरात घडली असून बेगमपुरा पोलिसांनी संबंधित प्रियकर आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आरोग्य विभागातून सेवानिवृत्त असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. शनिवारी रक्षाबंधनाच्या दिवशी मुलाने सोन्याची अंगठी मागितल्याने त्यांनी कपाट उघडले. त्यावेळी कपाटातील सर्व दागिने आणि रोकड गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत विचारणा केल्यानंतर मुलीने कबुली दिली की, तिने आईच्या नकळत हे सर्व दागिने आणि पैसे आपल्या प्रियकर मंगेश विलास पंडित (रा. बेगमपुरा) याला दिले.

मुलीने कबुली दिल्यानुसार, एका रात्री तिने दोरीच्या साहाय्याने बकेट खाली सोडून त्यात दागिने ठेवले आणि ते मंगेशकडे पाठवले. मंगेशने त्याच्या मित्र कुणाल माणिक केरकर (रा. बेगमपुरा) यांच्या मदतीने हे दागिने घेतले. या दागिन्यांचे पुढे काय झाले, याचा तपास सुरू आहे.

फिर्यादी महिलेने सोमवारी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून मुलगी, मंगेश पंडित आणि कुणाल केरकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,946 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क