छत्रपती संभाजीनगर : केदारनाथ यात्रेला गेलेल्या वाळूज येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाचा दरड कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल शनिवार, 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता घडली. ही घटना केदारनाथ येथील गौरीकुंडाहून सुमारे एक किलोमीटर उंचीवर उघडकीस आली आहे.

मृत तरुणाचे नाव परमेश्वर खवल (रा. साईबन हाऊसिंग सोसायटी, वडगाव कोल्हाटी) असे असून ते पडेगाव भागातील तारांगण येथे पत्नी, दोन मुली आणि आठ महिन्याच्या मुलासोबत वास्तव्यास होते. परमेश्वर हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्यांनी आठ वर्षांपूर्वी वडगाव कोल्हाटी येथे घर घेतले होते. त्यांच्या आई-वडिलांना केदारनाथ यात्रा घडवून आणण्याची इच्छा होती, मात्र वयामुळे ते शक्य न झाल्याने परमेश्वर स्वतः यात्रेसाठी गेले होते.

काल सकाळी गौरीकुंडाकडून पायी जात असताना अचानक डोंगराचा एक भाग कोसळला. यामध्ये परमेश्वर दबले गेले. स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून त्यांना रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी त्यांच्या घरी माहिती दिली तेव्हा वृद्ध आई-वडील घरी होते, दोन मुली शाळेत तर पत्नी रक्षाबंधनासाठी माहेरी गेली होती. मुलींच्या मदतीने परमेश्वर यांचा मोबाईल अनलॉक करून नातेवाईकांना संपर्क साधण्यात आला. मृत्यूची बातमी मिळताच परमेश्वर यांचे मोठे भाऊ तात्काळ विमानाने केदारनाथकडे रवाना झाले आहेत.

या दुर्दैवी घटनेने वाळूज व पडेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांत शोककळा पसरली आहे. केदारनाथ यात्रेतील दरड कोसळण्याच्या या घटनेने यात्रेकरूंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,362 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क