छत्रपती संभाजीनगर : शहरात डायल 112 वर फेक कॉल्सचा सुळसुळाट वाढत असून पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. “मृतदेह आढळलाय, लवकर पोलीस पाठवा” असा धक्कादायक कॉल आल्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी धाव घेतात; मात्र तो फेक असल्याचे उघड होत आहे. पाच दिवसांत तब्बल 37 वेळा अशी फसवणूक झाल्याने अखेर मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डायल 112 ही सेवा अडचणीत असलेल्या नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र काही जण या सेवेचा गैरवापर करून नाहक पोलिसांना त्रास देत असल्याचे प्रकार वाढले आहेत. अंमलदार मनोज गांगे आणि संदीप वैद्य डायल 112 वर ड्युटीवर असताना एका क्रमांकावरून सातत्याने कॉल येत होते. “श्री पब्लिक स्कूल, आदर्शनगर येथे मृतदेह पडला आहे” असा संदेश देऊन पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यायला भाग पाडले जात होते. पण प्रत्यक्षात अशी कोणतीही घटना नव्हती.

14 ते 18 ऑगस्टदरम्यान आरोपीने तब्बल 37 वेळा कॉल केले. फक्त 18 ऑगस्टला सहा कॉल्स आले आणि तेही प्रत्येक पाच मिनिटांच्या अंतराने. या त्रासाला कंटाळून मनोज गांगे यांच्या फिर्यादीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशा विचित्र कॉल्समुळे पोलिसांची वेळ आणि संसाधनांची नासधूस होत आहे. “सिमेंटचे पोते दुकानाबाहेर पडून आहेत, उचलण्यासाठी पोलीस पाठवा”, “कुत्रे भुंकत आहेत”, “दारू पाण्यासारखी लागते”, “बायको माहेरी गेली आहे, तिला आणा”, “माझे मूल रडतंय, पोलिसांनी शांत करावे”, “टॉयलेटमध्ये भाऊ आधी जातो, त्याला समजवा” असेही हास्यास्पद कॉल्स येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहर पोलिसांना डायल 112 वर दररोज सरासरी 135 ते 150 कॉल्स येतात. जानेवारी ते 19 ऑगस्टदरम्यान तब्बल 34,332 कॉल्स आले असून त्यातील सरासरी 20 टक्के फेक असल्याचे आकडेवारीत दिसून येते.

फेक कॉल्समुळे पोलिसांचा सरासरी रिस्पॉन्स टाइम जो 5 ते 5.30 मिनिटांचा होता, तो थेट 20 मिनिटांवर गेला आहे. त्यामुळे खरी आपत्कालीन घटना असताना पोलिसांचा प्रतिसाद उशिरा मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे. फेक कॉल करून पोलिसांची फसवणूक करणे हे जनतेच्या सुरक्षेशी थेट खेळण्यासारखे असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक जयश्री कुलकर्णी यांनी सांगितले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,205 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क