छत्रपती संभाजीनगर : शहरात बुधवारी (दि. २०) सायंकाळी न्यू शांती निकेतन कॉलनीमध्ये एका तरुणाने धक्कादायक पद्धतीने आत्महत्या केली. प्रथम गळफास घेण्याचा प्रयत्न करून अपयश आल्यावर त्याने गॅस सिलेंडरमध्ये कात्री खोचून गॅस लिकेज करीत स्फोट घडवून आपले जीवन संपवले. ही घटना पावणेपाच वाजता घडली असून, याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांत झालेल्या आत्महत्यांच्या मालिकेत ही आठवी घटना आहे.
मृत तरुणाचे नाव ओम संजय राठोड (वय २०, रा. बंबाटनगर) असे आहे. ओमचा मूळ गाव आंबा तांडा येथील असून, तो सध्या बंबाटनगरात राहात होता. कॉलेज जवळ असल्याने तो न्यू शांती निकेतन कॉलनीमध्ये आपल्या चुलते सुभाष राठोड यांच्या घरी वास्तव्यास होता. सुभाष राठोड हे सहकार खात्यात वर्ग-१ अधिकारी आहेत. बुधवारी ओमचे आई-मामा आणि इतर नातेवाईक नाशिकला गेले होते. वडिलांनी त्याला कॉलेजला सोडल्यानंतर घरी परतले. अंदाजे दुपारी तीन वाजता ओम कॉलेज संपवून घरी आला. त्यावेळी चुलती घरी होती. थोड्या वेळाने ती मुलाला आणण्यासाठी बाहेर गेली आणि या काळात ही घटना घडली.
पावणेपाच वाजता घरातून स्फोट झाल्याचा आवाज आला. माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. उपअग्निशमन अधिकारी विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आग विझवून सिलेंडर बाहेर काढले. मात्र, ओमचा मृतदेह मिळाला. दरम्यान, शेजारी राहणाऱ्या पोलीस निरीक्षकांच्या मदतीने बांधकाम मजुरांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला, पण तोपर्यंत ओमचा मृत्यू झाला होता.
ओम अभ्यासात अत्यंत हुशार होता. बारावीत त्याने तब्बल ९४ टक्के गुण मिळवले होते. तो सीएच्या तयारीत होता आणि दोन परीक्षा उत्तीर्णही झाला होता. तरीही त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समजू शकलेले नाही. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांवरून आत्महत्येचा निष्कर्ष निघतो आहे. सर्व दरवाजे व खिडक्या आतून बंद होत्या. फॅनला साडी लटकलेली आणि फॅनचे पाते वाकलेले आढळले, यावरून गळफास घेण्याचा प्रयत्न झाल्याचा अंदाज आहे. तसेच सिलेंडरमध्ये कात्री खोसून गॅस लीक केल्याचे स्पष्ट दिसत होते, असे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकरणी सहायक पोलीस आयुक्त रणजित पाटील, पोलीस निरीक्षक सचिन कुंभार आणि उपनिरीक्षक राहुल बिघोत यांनी घटनास्थळी भेट दिली. ओमच्या मृतदेहाचे शवविच्छेदन घाटीत करण्यात आले. ही घटना परिसरात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*