छत्रपती संभाजीनगर : शहरातील शहागंज परिसरात मंगळवारी (दि. १९ ऑगस्ट) दुपारी एसबीआयच्या एटीएममध्ये फसवणुकीची घटना घडली. या प्रकरणात मुदखेड येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले सय्यद सलीम अत्ताउल्ला यांची ४० हजार रुपयांची फसवणूक झाली. या संदर्भात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलीम हे सध्या वैद्यकीय रजेवर असून १५ ऑगस्टपासून ते छत्रपती संभाजीनगरात कुटुंबासह राहतात. मंगळवारी दुपारी १.१५ वाजता ते शहागंज येथील एसबीआय एटीएममध्ये गेले. त्यांनी पिन कोड बदलण्याची प्रक्रिया सुरू केली असता त्यांच्या मागे एक व्यक्ती उभा होता. त्याने संपूर्ण प्रक्रिया पाहत पिन नंबर लक्षात ठेवला.
यानंतर त्या व्यक्तीने बॅलन्स तपासण्याचे सांगून हातचलाखीने सलीम यांचे मूळ एटीएम कार्ड बदलले आणि त्याऐवजी जयकुमार पाईकराव नावाचे दुसरे कार्ड त्यांच्या हाती दिले. सलीम यांना याचा पत्ताच लागला नाही. दरम्यान, ठगाने मूळ कार्ड घेऊन शहरातील विविध एटीएममधून ४० हजार रुपये काढले. पैसे काढल्यानंतर सलीम यांनी बॅलन्स तपासताना फसवणुकीचा अंदाज आला. त्यांनी तातडीने शेजारील बँकेत जाऊन माहिती दिली, पण तोपर्यंत रक्कम काढली गेली होती.
याबाबत सलीम यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी नागरिकांना एटीएम व्यवहार करताना अपरिचित व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, तसेच सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*