छत्रपती संभाजीनगर : शहरातील पिसादेवी परिसरात राहणाऱ्या तरुणाला इंडोसाइन बँकेचे क्रेडिट कार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली तब्बल ४९ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार १६ जून रोजी घडला असून, याबाबत १७ ऑगस्ट रोजी चिकलठाणा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुरेश ज्ञानेश्वर वैद्य (वय ३२, रा. आदर्श रेसिडेन्सी, पिसादेवी) हे मिशो डिशी, चिकलठाणा येथे नोकरी करतात. त्यांच्याकडे इंडोसाइन बँकेचे क्रेडिट कार्ड असून, १३ जून रोजी दुपारी त्यांना एक अनोळखी फोन आला. समोरच्या व्यक्तीने इंडोसाइन बँकेतून बोलत असल्याचे सांगत ३ हजार रुपयांची वेलकम बोनस ऑफर मिळाल्याचे सांगितले. ही ऑफर रिसिव्ह का केली नाही, असे विचारत त्याने सुरेश यांची जन्मतारीख, आधार क्रमांक, पॅन नंबर अशा महत्त्वाच्या माहितीची खातरजमा करून घेतली.
यानंतर भामट्याने सुरेश यांना एक लिंक मेसेज केली. त्या लिंकवर क्लिक करताच क्रेडिट कार्डची माहिती भरावी लागली. ‘डन’ केल्यानंतर अचानक सुरेश यांचा मोबाइल हँग झाला. काही वेळातच त्यांच्या मोबाईलवरून ४९ हजार रुपयांचे ट्रान्झेक्शन झाल्याचा मेसेज आला. घाबरलेल्या सुरेश यांनी तातडीने बँकेशी संपर्क साधून कार्ड ब्लॉक केले.
यानंतर त्यांनी ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि बँकेकडून ४९ हजार रुपयांचे ट्रान्झेक्शन फ्रिज करण्यात आले. मात्र अद्याप रक्कम परत मिळालेली नाही. त्यामुळे अखेर सुरेश यांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रविकिरण दरवडे करत आहेत.
पोलिसांकडून नागरिकांना सतत सल्ला दिला जात आहे की, अनोळखी व्यक्तींना आधार, पॅन किंवा बँकेसंबंधी माहिती देऊ नये तसेच कुठल्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये. सायबर फसवणूक टाळण्यासाठी सजग राहणे गरजेचे असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*