छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सव हा यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जाणार असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी डीजेमुक्त उत्सव साजरा करावा आणि पारंपारिक वाद्यांचा वापर करून शांततेत आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केले. एमआयटी महाविद्यालयाच्या मंथन सभागृहात झालेल्या शांतता समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

बैठकीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जालना मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे, राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड, आमदार प्रदीप जयस्वाल, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार तसेच विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

शांततेत व उत्साहात उत्सव साजरा करावा

पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने गणेशोत्सवासाठी उत्कृष्ट तयारी केली आहे. ही आनंदाची बाब असून उत्सव पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सुखद अनुभव मिळावा यासाठी डीजेचा वापर टाळून पारंपारिक वाद्य, ढोलताशे यांच्या गजरात उत्सव साजरा करावा. डीजेमुळे ध्वनीप्रदूषण वाढते, त्यामुळे डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा. त्याचबरोबर अमली पदार्थांच्या विक्रीवर प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

सर्वांनी शांततेसाठी सहकार्य करावे

शहर विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत असून उत्सवाच्या माध्यमातून शांतता आणि सलोखा टिकवणे आवश्यक असल्याचेही शिरसाट यांनी सांगितले.

कायदा सुव्यवस्थेची काळजी घ्यावी

अंबादास दानवे यांनी महापालिकेला गणेश विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. खासदार डॉ. कल्याण काळे यांनी उत्सव काळात लेझर लाईटचा वापर टाळण्याचे तसेच अमली पदार्थांच्या विक्रीवर वेळेत कारवाई करण्याचे आवाहन केले. तर खासदार डॉ. भागवत कराड यांनी गणेश मंडळांनी अवयवदान, आरोग्य शिबिरे, सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले.

पर्यावरणपूरक उपक्रम राबवावेत

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गणेशोत्सव हा एकतेचा आणि संस्कृतीचा उत्सव असल्याचे सांगून मंडळांनी पर्यावरण रक्षणाचे संदेश देणारे देखावे सादर करावेत आणि राज्य शासनाच्या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे सांगितले. वृक्षारोपणासारख्या उपक्रमात प्रत्येक मंडळांनी सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

महापालिकेकडून सुविधा

महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी परवानग्या मोफत दिल्या जातील, फक्त माहिती देणे आवश्यक आहे, असे सांगितले. तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू असून, उत्सव काळात पाणीपुरवठा, रुग्णवाहिका, रुग्णालयीन सुविधा, मुख्य ठिकाणी रोषणाई, विसर्जनावेळी निर्माल्य संकलन, फिरती शौचालये, कृत्रिम तलाव, मूर्ती दान यासाठी व्यवस्था केली आहे. नागरिकांनी अडचणी असल्यास महापालिकेच्या संपर्क कक्षाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी नमूद केले.

पोलीस प्रशासनाचे आवाहन

पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी गणेशोत्सव डीजेमुक्त व लेझर लाईटविना साजरा करावा, सोशल मीडियावर चुकीची पोस्ट्स टाळाव्यात आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

बैठकीत विविध गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांनी खड्डे बुजवणे, विद्युत तारा सुरक्षित करणे, अमली पदार्थावरील कारवाई अशा विविध मागण्या केल्या. जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन शांततेत आणि समन्वयाने गणेशोत्सव साजरा होईल, अशी ग्वाही दिली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,063 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क