छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाईला नशेच्या गर्तेत ओढणाऱ्या त्रिकुटाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक करून मोठा धक्का दिला आहे. २९ ऑगस्ट रोजी सय्यद नजीरुद्दीन सय्यद रियाजोद्दीन (बाबर कॉलनी, हत्तीसिंगपुरा), अमजद खान अन्वर खान (इकबालनगर, नांदेड) आणि इरफान घोरवडे (नांदेड) या तिघांना पकडण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल १,२७० नशेच्या सिरपच्या बाटल्या जप्त केल्या होत्या.
१ सप्टेंबर रोजी या आरोपींची जिन्सी भागात पोलिसांनी धिंड काढल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे. पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी आरोपींना ‘ये सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’ असे सांगितल्यावर आरोपी अक्षरशः हात जोडून रडू लागले. आयबी मेसपासून हाटेल अमोदीपर्यंत आणि पुढे हत्तीसिंगपुरा ते कटकट गेट या मार्गावर काढलेल्या धिंडीसाठी मोठी गर्दी जमली होती. ज्या भागात आरोपींची दहशत होती, त्याच भागात पोलिसांनी हा उपक्रम राबवला. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
घोरवडे हा मूळचा एमआर होता. १७ वर्षे नोकरी करून त्याने एजन्सी घेतली आणि थेट कंपनीकडून नशेची औषधे विकण्याचा व्यवसाय सुरू केला. गुजरात आणि मध्यप्रदेशातून त्याला माल मिळत होता. या रॅकेटमागे मोठे सिंडीकेट असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
या चौकशीतून शहरातील आठ प्रमुख पेडलर आणि काही मेडिकलवाल्यांची नावे समोर आली आहेत. लवकरच त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. आरोपी सय्यद नजीरुद्दीनचा जिन्सी भागात दहशत होती. काही वर्षांपूर्वी खबऱ्याला मारहाण करून त्याचा पाय मोडल्याचा प्रकारही उघड झाला आहे. त्या खबऱ्यानेही पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले.
या संपूर्ण ऑपरेशनमध्ये पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्यासह अमलदार निर्मला निंभोरे, छाया लांडगे, संजीवनी शिंदे, ज्योती कीर्तीकर आदींची उपस्थिती होती. पोलिसांच्या या कठोर पावलाने शहरात नशेच्या रॅकेटविरोधात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*