छत्रपती संभाजीनगर : शहरात एका धक्कादायक घटनेचा उलगडा झाला असून, उस्मानपुऱ्यातील चेंबरमध्ये पाच महिन्यांचे मृत नवजात स्त्री अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना ३० जुलै रोजी उघडकीस आली असून तब्बल एक महिन्यानंतर म्हणजे ३० ऑगस्ट रोजी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी बादल रतन हिवाळे (३३, रा. छोटा मुरलीधरनगर, उस्मानपुरा) हे महापालिकेत चेंबर साफसफाईचे काम करतात. ३० जुलै रोजी कबीरनगरातील हाफसीची गल्ली येथे चेंबर कोंडले होते. याची माहिती नितीन साळवे यांनी हिवाळे यांना दिली. त्यानंतर हिवाळे आणि त्यांचा सहकारी घनशाम रोकडे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चेंबर उघडले असता त्यातून पाणी वाहत होते, मात्र कचऱ्यासोबत काहीतरी अडकल्याचे दिसले. तपासल्यावर ४ ते ५ महिन्यांचे प्री-मॅच्युअर स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळले.
ही माहिती मिळताच उस्मानपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. डायल ११२ चे वाहन तेथे आले तसेच महिला पोलीस कर्मचारीही घटनास्थळी हजर झाले. अर्भकाला तात्काळ घाटी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर फिर्यादी हिवाळे मानसिक धक्क्यात आले आणि आजारी पडले. त्यामुळे त्यांनी तात्काळ फिर्याद नोंदवली नाही. पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु अखेर त्यांनी ३० ऑगस्ट रोजी फिर्याद नोंदवली.
या प्रकरणात उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हेमंत सुपेकर करीत आहेत. शहरात यापूर्वीही अशा घटना घडल्या असून, पुन्हा एकदा या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून अर्भकाच्या आईचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*