छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सवाच्या उत्साहात जिल्ह्यात साथीच्या आजारांचा फैलाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. डेंग्यू, सर्दी-खोकला, फ्लू, विषमज्वर, मलेरिया आदी आजारांनी नागरिकांना हैराण केले असून, रुग्णालये रुग्णांनी अक्षरशः फुल्ल झाली आहेत. पावसाळ्यातील अस्वच्छता, दूषित अन्न-पाणी, डास-कीटकांचा प्रादुर्भाव आणि हवामानातील सतत बदल या कारणांमुळे डेंग्यूसारख्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी साथीचे आजार तुलनेने कमी प्रमाणात आढळत असले तरी फ्लू व डेंग्यूचे रुग्ण लक्षणीय संख्येने वाढले आहेत. विषमज्वर आणि मलेरियाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळले. मात्र तज्ज्ञांच्या मते, पुढील काळात परिस्थिती गंभीर होऊ नये यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अंगात कणकण, ताप, अंगदुखी, मळमळ, उलट्या अथवा त्वचेवर पुरळ अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. दुर्लक्ष केल्यास आजार गंभीर रूप धारण करू शकतो. विशेषतः डेंग्यूमध्ये डोळ्यांच्या मागे तीव्र डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी ही मुख्य लक्षणे असून, वेळेवर उपचार घेणे गरजेचे आहे.
नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उकळलेले किंवा स्वच्छ पाणी प्यावे, दूषित अन्न टाळावे, घर व परिसर स्वच्छ ठेवावा, डासांची उत्पत्ती होईल अशी ठिकाणे नष्ट करावीत. तसेच खोकताना-शिंकताना रुमालाचा वापर करावा. ताप अथवा सर्दीची सुरुवातीची लक्षणे जाणवली तरी डॉक्टरांचा सल्ला घेणे हितावह आहे.
दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांनी सांगितले की, “सध्या रुग्णालयात ‘व्हायरल’चे रुग्ण वाढले आहेत. आरोग्य विभाग सतर्क असून, उपचारासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे.”
गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने स्वच्छता आणि वैयक्तिक आरोग्याची काळजी घेणे हीच साथरोगांपासून बचावाची गुरुकिल्ली असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*