छत्रपती संभाजीनगर : या वर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिन शनिवार, २१ जून रोजी साजरा होणार असून जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक बिबी का मकबरा प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या योग दिनी जास्तीत जास्त योग संस्था, व्यायामप्रेमी, शालेय विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण व आश्विनी लाटकर, मनपा शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे, पुरातत्त्व विभागाचे डॉ. एस.के. भगत, तसेच विविध शासकीय व योग संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आयुष व सांस्कृतिक मंत्रालयाच्या सूचनेनुसार, यंदा योग दिनाचे आयोजन ऐतिहासिक स्थळी करणे आवश्यक असल्याने बिबी का मकबरा येथे कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात शनिवार, २१ जून रोजी सकाळी ६:३० वाजता होईल. यामध्ये सामूहिक योगासने व योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश थेट प्रसारित केला जाईल.
जिल्ह्यातील सर्व योग संस्था, शाळा, महाविद्यालये, आरोग्य संस्था यांनी या दिवशी आपापल्या स्तरावर योग दिनाचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले आहे.
योग आरोग्याचा मूलमंत्र आहे आणि तो सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*