छत्रपती संभाजीनगर : वातावरणातील सततच्या चढ-उताराचा मोठा फटका सध्या शहरातील लहान मुलांना बसत असून, सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यंदा विषाणूचा व्हेरिएंट बदलल्यामुळे हा आजार लवकर बरा होत नसल्याचे बालरोगतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ सर्दी-खोकला राहिल्यास त्याचे थेट न्यूमोनियामध्ये रूपांतर होत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे.

शहरातील विविध रुग्णालयांच्या बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) दररोज सुमारे १,५०० बालके उपचारासाठी येत आहेत. यापैकी किमान १५० पेक्षा अधिक मुलांना गंभीर लक्षणांमुळे रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. अतिवृष्टीनंतर आता थंडीच्या कडाक्यात दिवसेंदिवस होणाऱ्या हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होत आहे. थोडी जरी थंडी वाढली तरी मुलांना सर्दी होते आणि त्यानंतर ताप व खोकल्याचा त्रास सुरू होतो. हा आजार दोन ते तीन आठवडे पाठ सोडत नसल्याने बालके व पालक दोघेही त्रस्त झाले आहेत.

बालरोगतज्ज्ञांच्या माहितीनुसार, एच-१, एन-१ (स्वाइन फ्लू) या विषाणूच्या जनुकीय रचनेत बदल होऊन सध्या एच-३, एन-२ हा उपप्रकार अधिक सक्रिय झाला आहे. या व्हेरिएंटमुळे कोरडा खोकला दीर्घकाळ राहतो आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या मुलांमध्ये आजार लवकर न्यूमोनियामध्ये बदलतो.

शहरात सुमारे १५० बालरुग्णालये असून सर्वच ठिकाणी रुग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे. तपासणीस आलेल्या रुग्णांपैकी किमान १० टक्के मुलांना दाखल करावे लागत असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. सखा पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, तज्ज्ञांनी पालकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुलांना थंडीत घराबाहेर काढणे टाळावे, बाहेर जाताना कानटोपी व स्वेटरचा वापर करावा, कोमट पाणी द्यावे आणि सर्दी साधी समजून घरगुती उपायांवर वेळ घालवू नये. ताप, सततचा खोकला, श्वास घेण्यास त्रास किंवा खाण्यापिण्यातील बदल दिसताच त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/GlraBleBDXk4TRi1fKkvIy

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

426 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क