छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तरुण-तरुणींना नशेच्या गर्तेत ओढणारे मोठे रॅकेट छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी धडक कारवाई करून उध्वस्त केले आहे. ‘कोडेन फॉस्फेट’ या घटकाचा वापर असलेल्या खोकल्याच्या सिरपचा पुरवठा करून मोठ्या प्रमाणावर तरुण पिढीला व्यसनाधीन केले जात होते. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक, गुन्हे शाखा आणि अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या कारवाईत तब्बल १२ जणांना अटक करण्यात आली असून ४१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी १२ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तीन महिन्यांचा शिताफीने केलेला तपास

या रॅकेटचा पर्दाफाश एका दिवसात झालेला नसून गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांनी या टोळीवर लक्ष ठेवले होते. सुरुवातीला एका पेडलरला पकडून पोलिसांनी त्याच्याकडून माहिती घेतली. चौकशीत आरोपी रुपेश पाटील याचा मोबाईल क्रमांक मिळाला आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी गुप्त हालचाली सुरू केल्या. त्यानंतर या टोळीचे नेटवर्क हळूहळू उघड होत गेले.

१२ सप्टेंबर रोजी पोलिसांना पक्की माहिती मिळाली की, अविनाश पाटील हा वाळूज येथील व्हीआरएल लॉजिस्टिक्सच्या गोदामातून औषधांचे पार्सल घेण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अविनाशला ताब्यात घेतले. पुढील चौकशीत या रॅकेटचे धागेदोरे अधिकाधिक स्पष्ट झाले.

१३ जिल्ह्यांमध्ये पसरलेले नेटवर्क

या कारवाईदरम्यान पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली. तब्बल १३ जिल्ह्यांमध्ये या रॅकेटचे जाळे पसरलेले असून २०० हून अधिक पेडलर्सच्या माध्यमातून औषधांची विक्री सुरू होती. विद्यार्थ्यांपासून तरुणाईपर्यंत अनेक जण या नशेच्या विळख्यात अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपींची यादी उघड

या प्रकरणी अटक झालेल्या आरोपींमध्ये अविनाश रामकृष्ण पाटील (३४, जळगाव), समीर युनूस शेख (२३, मोतीकारंजा), अब्दुल अजीम कादौर शहा (३०, मिसारवाडी), अरशद इब्राहिम पठाण (२६), मोसीन अमिन तांबोळी (२५), सय्यद समीर उर्फ स्टायलो (२७), सोहेल हानिफ शाह (२४), सय्यद अल्ताफ जफर (२२, बायजीपुरा), रिजवान खान रशीद खान (२५, रेगटीपुरा), अमोल दत्तात्रय येवले (३०, नाशिक), रुपेश रामकृष्ण पाटील (२९, जळगाव) यांचा समावेश आहे.

२० बॉक्समधून जप्त २५०४ बाटल्या

पोलिसांनी २० बॉक्समधून तब्बल २५०४ बाटल्या जप्त केल्या. ‘रेटस सिरप’ या नावाने बाजारात उपलब्ध असलेल्या या बाटल्यांमध्ये कोडेन हा अमली पदार्थ घटक नमूद होता. शिवाय पोलिसांनी एक स्विफ्ट कार, मोबाईल आणि इतर साहित्य जप्त केले. एकूण मुद्देमालाची किंमत १२ लाख ४८ हजार रुपये एवढी आहे. अटक आरोपींना गंगापूर न्यायालयात हजर केले असता १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली गेली.

बंद मेडिकल दुकानाच्या नावाने ऑर्डर

या तपासादरम्यान एक धक्कादायक बाब उघडकीस आली. मुख्य आरोपी रुपेश पाटील हा एका औषध कंपनीत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत होता. त्याने त्याचा मित्र अमोल दत्तात्रय येवले याच्या बंद असलेल्या “येवले मेडिकल अँड जनरल स्टोअर”च्या नावाचा वापर केला. बनावट कागदपत्रे तयार करून त्या दुकानाच्या नावावरून मोठ्या प्रमाणात औषधांची ऑर्डर देण्यात आली. त्याबदल्यात अमोल येवले याला २० टक्के कमिशन देण्याचा करार करण्यात आला होता.

अतिघाईमुळे उघड झाले रॅकेट

रुपेश पाटील याची घाई त्यालाच महागात पडली. उत्तराखंडहून औषधांचे मोठे कन्साइनमेंट मागवले होते. नेहमीप्रमाणे हे पार्सल नाशिकला पाठवले गेले असते तर तपास वेगळ्या मार्गाने गेला असता. मात्र यावेळी पार्सल वाळूजच्या गोदामात अडकले. अनेक दिवस वाट पाहूनही डिलिव्हरी न झाल्याने रुपेशने थेट कंपनीच्या व्यवस्थापकाला फोन केला. अनेक पेडलर्सकडे डिलिव्हरी करायची असल्याने त्याला संयम राहिला नाही. हाच त्याचा मोठा घातक पाऊल ठरला आणि पोलिसांच्या जाळ्यात तो अडकला.

समाजासाठी गंभीर इशारा

या कारवाईमुळे केवळ पोलिसांचे धाडस अधोरेखित झाले नाही, तर समाजासाठीही एक गंभीर इशारा मिळाला आहे. शिक्षण घेणाऱ्या तरुण पिढीमध्ये अशा सिरपच्या माध्यमातून नशेची सवय लावली जात आहे. सहज उपलब्ध होणाऱ्या या औषधांमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून भविष्यात गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळू शकते.

पुढील तपास सुरू

सध्या पोलिसांनी १२ जणांना अटक करून कोठडीत पाठवले असले तरी या रॅकेटमागे आणखी मोठे मासे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ४१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांतही अशा प्रकारची रॅकेट्स कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

4,390 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क