छत्रपती संभाजीनगर : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गावातील दोन मित्रांमधील वैमनस्य अखेर खुनात परिवर्तित झाले. ‘तुझ्यामुळे माझं लग्न जमत नाही’ या कारणावरून झालेल्या वादातून मित्राचा निर्घृण खून करण्यात आला. गौताळा अभयारण्यालगत असलेल्या सनसेट पॉइंटजवळ जंगलात हा थरार घडला होता. विशेष म्हणजे मृताची ओळख पटवण्यात पोलिसांनी जबड्यातील स्टील क्लिपच्या आधारे ‘एआय’चा वापर करून चौकशी पुढे नेली आणि काही दिवसांत आरोपीला गजाआड केले.
३ सप्टेंबर रोजी जंगलात एका तरुणाचा शिरच्छेद केलेला मृतदेह सापडला होता. २४ तासांत डोक्याचा भागही सापडला मात्र मृतदेह विद्रुप झाल्याने पोलिसांना ओळख पटवणे कठीण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून जबड्यातील स्टील क्लिप जप्त केली. या क्लिपच्या आधारे तंत्रज्ञानाच्या मदतीने चौकशी सुरू करून त्यातून ही क्लिप इगतपुरी येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये अपघातानंतर बसवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मृत व्यक्तीची ओळख निखिल हिरामण सूर्यवंशी (२८, रा. शिंदी, ता. चाळीसगाव) अशी पटली.
या खुनाचा तपास करण्यासाठी ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक नेमण्यात येऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तब्बल सात दिवस शिंदी गावात राहून माहिती गोळा करत होते. अखेर मृताचा मित्र श्रावण ज्ञानेश्वर धनगर याच्यावर संशय बळावला. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
चौकशीत त्याने सांगितले की, निखिल हा गुंडगिरी, चोरी आणि दारूच्या व्यसनामुळे गावात बदनाम झाला होता. तो कायम ‘तुझ्यामुळे माझं लग्न जमत नाही’ असे म्हणून मला दोष देत असे. २६ ऑगस्ट रोजी त्याने सहलीच्या बहाण्याने गौताळ्यात नेले. तेथेच त्याने माझ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र मी प्रतिकार करत त्याच्यावरच कुऱ्हाडीचे वार केले. त्यानंतर त्याचे शिर धडापासून वेगळे करून दरीत फेकले, असे त्याने कबूल केले.
पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहायक निरीक्षक संतोष मिसळे व पवन इंगळे यांच्या पथकाने हा तपास कौशल्याने उलगडला. घटनास्थळी सापडलेली अंतर्वस्त्रे, घड्याळ आणि जबड्यातील क्लिपच्या आधारे कुटुंबीयांनीही मृताची ओळख पटवली. पोलिसांच्या अथक श्रमांसोबत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने या खुनाचा उलगडा काही दिवसांतच झाला.
या प्रकरणामुळे ग्रामीण भागात खळबळ उडाली असून, वैयक्तिक वादातून किती भयंकर पाऊल उचलले जाऊ शकते याचे हे उदाहरण असल्याची चर्चा रंगली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*