छत्रपती संभाजीनगर : महागड्या दुचाकी चोरी करून ती स्वस्तात विक्री करून पैसे ऑनलाइन गेममध्ये उडवणाऱ्या दोन सराईत चोरांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींची नावे उमेश सुभाष कळसकर (२४, रा. मुकुंदवाडी, मूळ सुकापुरी, ता. अंबड) आणि पुरुषोत्तम बंडू शिंदे (२०, रा. मुकुंदवाडी, मूळ अंबड) अशी आहेत. त्यांच्या ताब्यातून तीन महागड्या दुचाकी, त्यात दोन बुलेट व एक स्पोर्ट बाईक, जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांचा तिसरा साथीदार फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
गजानननगर भागातील गणेश शिंदे यांची २३ ऑगस्ट रोजी बुलेट चोरीला गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्हीत आरोपींची हालचाल कैद झाली होती. मात्र, ते रेकॉर्डवरील गुन्हेगार नसल्याने तपास अडखळत होता. दरम्यान, काही तरुण इंस्टाग्रामवर महागड्या बाईक विक्रीसाठी फोटो टाकत असल्याचे पोलिसांना समजले. ग्राहक म्हणून संपर्क साधला असता, आरोपी उमेशने भेटण्यास नकार देऊन केवळ माहिती दिली. त्यावेळी कॉलदरम्यान रेल्वेचा आवाज ऐकू आल्याने पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधला.
निरीक्षक अशोक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अर्जुन राऊत, सुनील म्हस्के, संदीप बिडकर, विलास सोळंके, प्रशांत नरोडे व अजय कांबळे यांनी रेल्वे रुळाजवळ सापळा रचला. काही दिवसांपूर्वी आरोपी पाणीपुरी खाण्यासाठी आल्यावर पोलिसांनी त्याला जेरबंद केले. त्यानंतर त्याचा साथीदार पुरुषोत्तमलाही अटक झाली. चौकशीत दोघांनीही महागड्या बाईक चोरी करून त्या १० ते १५ हजार रुपयांना विकल्याचे आणि त्यातून मिळालेली रक्कम ऑनलाइन गेममध्ये खर्च केल्याचे कबूल केले. गणेशोत्सवाच्या काळात त्यांनी पुण्यात दगडूशेठजवळ गर्दीतूनही एक दुचाकी चोरली होती, मात्र तेथून पळ काढण्यात यशस्वी झाले होते.
या कारवाईत पुंडलिकनगर पोलिसांनी तीन दुचाकी हस्तगत करत दोन सराईतांना गजाआड केले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*