छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर येथील भुयारी मार्गावर साचलेल्या पाणी व चिखलामुळे अखेर एकाचा जीव गेला आहे. या मार्गावर झालेल्या अपघातात अंकुश भाऊराव शंकपाळ (६४, रा. चिकलठाणा) या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, मृताच्या नातेवाइकांनी मार्गाचे काम करणाऱ्या अभियंता व ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

घटना शुक्रवारी (१९ सप्टेंबर) दुपारी घडली. शंकपाळ हे इलेक्ट्रिक स्कूटीवरून बीड बायपासकडे सर्व्हिसिंगसाठी जात होते. भुयारी मार्गात साचलेल्या पाणी व चिखलामुळे त्यांची दुचाकी घसरली. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने ॲपेक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच शनिवारी (२० सप्टेंबर) त्यांचा मृत्यू झाला.

या अपघातानंतर मृताचे कुटुंबीय व नातेवाइकांनी संताप व्यक्त करत, “भुयारी मार्गाचे बांधकाम दर्जाहीन झाले असून त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. या मार्गावर अनेक वेळा पाणी व चिखल साचतो, याकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासन व ठेकेदारांकडून कोणतीच सुधारणा झाली नाही,” अशी प्रतिक्रिया दिली. तसेच, दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत त्यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

शंकपाळ हे शेती व्यवसाय करत होते. त्यांच्या पश्चात दोन मुलं आहेत. घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाजीनगर भुयारी मार्गाबाबत पूर्वीपासूनच चुकीच्या नियोजनाचे आरोप होत होते. यापूर्वी अनेक वाहनचालकांना किरकोळ अपघातांना सामोरे जावे लागले होते, मात्र आता मृत्यू झाल्याने नागरिकांनी या मार्गाची तातडीने दुरुस्ती करून जबाबदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IlPqAw1ds5NJ1KgrzA4SQ8?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,768 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क