छत्रपती संभाजीनगर : सिडको बसस्थानकातून पुण्याकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या शिवाई बसने महावीर चौकात एका २८ वर्षीय तरुणाला चिरडल्याची दुर्दैवी घटना रविवारी (२१ सप्टेंबर) दुपारी घडली. या अपघातात राहुल अशोक जाधव (२८, रा. रांजणगाव शेणपुंजी) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल जाधव रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. रविवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास तो महावीर चौकातून पायी जात असताना सिडकोहून मध्यवर्ती बसस्थानकाकडे भरधाव वेगात जाणाऱ्या शिवाई बसने (एमएच २० जीझेड ०४९६) त्याला जोरदार धडक दिली. धडकेनंतर बसचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा चेहरा पूर्णपणे छिन्नविच्छिन्न झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की पाहणाऱ्यांचे डोळे पाणावले.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. तातडीने क्रांती चौक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी शिवाई बसचा चालक नितीन संतोष शेवाळे (३०, रा. मुकुंदवाडी) याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वीच राहुलचा विवाह झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा, आई-वडील असा परिवार आहे. या अपघातामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील नागरिकांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, वाहतुकीत सुरक्षिततेसाठी प्रशासनाने अधिक काळजी घेण्याची मागणी केली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KlbV2BdtEZ4Fbi6usVHmPo?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*