छत्रपती संभाजीनगर : बारमध्ये दारु पिऊन बाहेर आल्यानंतर कारसमोर लघुशंका करण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात वाद पेटला. हा वाद एवढ्या टोकाला गेला की, कारचालकाचा दुचाकीवर पाठलाग करून त्याच्यावर थेट गोळीबार करण्यात आला. रविवारी मध्यरात्री साडेबाजोट्याच्या सुमारास चिकलठाणा औद्योगिक वसाहती परिसरात ही धक्कादायक घटना घडली.
जमिनीचे व्यवहार करणारे तौफिक शौफिक पठाण (३०, रा. कमळापुर) हे २१ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजता मित्र निसार जबार याच्यासोबत पाम हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवणानंतर मध्यरात्री १२.३० वाजता ते हॉटेलमधून बाहेर पडले. यावेळी पार्किंगध्ये गणेश औताडे नावाचा तरुण दारुच्या नशेत बाहेर आला आणि तौफिक यांच्या कारसमोर लघुशंका करू लागला. यावरून दोघांत वाद झाला. शिविगाळ, धक्काबुक्कीपर्यंत प्रकार गेला. मात्र, इतरांनी हस्तक्षेप करून प्रकरण मिटवले.
तौफिक आणि निसार साधारण १ वाजता कारने कलाग्राम मार्गे प्रोझोन मॉलच्या दिशेने जात होते. यावेळी निसारने महावितरण कार्यालयासमोर लघुशंकेसाठी कार थांबवली. तेवढ्यात एपीआय कॉर्नरच्या दिशेने त्रिपलसीट मोपेडस्वार आले. त्यांनी काही अंतरावर दुचाकी थांबवली आणि त्यातील एकाने पिस्तूल काढून तौफिक यांच्या दिशेने धावत येत गोळी झाडली. सुदैवाने तौफिक मागे सरकल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र, गोळी निसार यांच्या कानाजवळून जाऊन कारच्या काचेवर आदळली.
प्राण वाचल्याने तौफिक व निसार तात्काळ एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गेले. मात्र, हद्दीअभावी त्यांना सिडको पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले. तोपर्यंत अज्ञातांनी निसार यांच्या गाडीची तोडफोड केली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार, सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KlbV2BdtEZ4Fbi6usVHmPo?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*