छत्रपती संभाजीनगर : शहरातील टीव्ही सेंटर परिसरात मंगळवारी (२३ सप्टेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास हातात कोयता घेऊन दहशत पसरवणाऱ्या तरुणाला नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पकडले. गणेश सुभाष सोनवणे (२४, रा. मिसारवाडी) असे या तरुणाचे नाव असून त्याच्याकडून कोयता आणि धारदार चाकू जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सिडको पोलिसांकडून सुरू आहे.
सिडको एम-२ परिसरातून हा तरुण पिसादेवीकडे जात असताना तो मोठ्या आवाजात शिवीगाळ करत होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक कोयता घेऊन तरुण रस्त्यावर दिसल्याने पादचारी व वाहनचालकांची मोठी तारांबळ उडाली. ही बाब लक्षात येताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तत्परतेने पोलिसांना कळवले व त्याचा पाठलाग सुरू केला.
मनसेचे विभागप्रमुख चंदू नवपुते यांनी पोलिसांसह पिसादेवी रोडवर त्याला अडवून झडप घातली. झडती घेतली असता त्याच्याकडे हातात टोकदार कोयता व पाठीवर बांधलेला धारदार चाकू आढळला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत सिडको पोलिस ठाण्यात आणले. प्रकरणाचा तपास हेडकॉन्स्टेबल लेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, या परिसरात नशेखोरांचा अड्डा वाढत असल्याचा आरोप मनसेचे विभागप्रमुख चंदू नवपुते यांनी केला आहे. टीव्ही सेंटर चौकातील मैदानात मोठ्या प्रमाणावर नशेखोर जमून महिलांना त्रास देत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या प्रकरणी पोलिसांनीही लक्ष घालून कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व स्थानिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KlbV2BdtEZ4Fbi6usVHmPo?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*