छत्रपती संभाजीनगर : वेरूळ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन चोरी करून तब्बल १६ लाख ७७ हजारांची रोकड लंपास करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि. २२) पडेगावातून गजाआड केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अटकेतील आरोपींची नावे दयासिंग गुलजारसिंग टाक (४५, रा. जालना), जीवन विजय वाघ (२८, रा. पडेगाव), सतबिरसिंग हरबनसिंग कलानी (२१, रा. उस्मानपुरा) आणि युवराज ऊर्फ इल्लम बाळासाहेब मंडोरे (४४, रा. बनेवाडी) अशी आहेत. तर पाचवा साथीदार आकाशसिंग बावरी हा अद्याप फरार आहे.
घटनाक्रम असा की, ११ सप्टेंबर रोजी मध्यरात्री चोरट्यांनी वेरूळ येथील कैलास हॉटेलसमोर असलेल्या एसबीआयच्या एटीएम मशीनवर धाड टाकली. चोरीसाठी वापरलेला अशोक लेलंड मिनी टेम्पो भक्तीनगर येथून चोरी करण्यात आला होता. चोरट्यांनी मशीनला दोर बांधून गाडीच्या सहाय्याने खेचून बाहेर काढले आणि त्यात असलेली रोकड घेऊन पसार झाले. बँकेचे चॅनेल मॅनेजर विकास निकाळजे यांनी या प्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या पथकाला तपासाची जबाबदारी देण्यात आली.
तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली. अखेर पडेगाव परिसरात सापळा रचून चार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. आरोपींनी चोरीनंतर एटीएम मशीन आझादनगरमधील एका बांधकामस्थळी नेऊन कटर व ड्रिल मशीनच्या सहाय्याने फोडले होते. त्यानंतर १६ लाख ७७ हजार रुपयांची रोकड आपापसात वाटून घेतली. चोरीसाठी वापरलेला टेम्पो मात्र त्यांनी मिटमिटा भागात टाकून दिला होता.
या पैशातून टोळीतील काहींनी दुचाकी आणि महागडे मोबाईल खरेदी केले. पोलिसांनी या कारवाईत एकूण १२ लाख ७० हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात ४ लाख १४ हजार ९०० रुपये रोख, एक कार, दुचाकी, सात मोबाईल, एअर गन, इलेक्ट्रिक कटर, ड्रिल मशीन, धारदार चाकू आदी साहित्याचा समावेश आहे.
या यशस्वी कारवाईत पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सपोनि सुधीर मोटे, पोउपनि महेश घुगे, श्रीमंत भालेराव, प्रमोद पाटील, कासीम शेख, सचिन राठोड, अनिल चव्हाण, जनाबाई चव्हाण, कविता पवार, बलबिरसिंग बहुरे, आनंद घाटेश्वर, शिवाजी मगर, योगेश तरमाळे आणि जीवन घोलप यांचा सहभाग होता. या प्रकरणी पुढील तपास खुलताबाद पोलिस करत आहेत.
या कारवाईनंतर परिसरात पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत असले तरी फरार आरोपी आकाशसिंग बावरीला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. या घटनेमुळे एटीएम सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KlbV2BdtEZ4Fbi6usVHmPo?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*