छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे एक हृदयद्रावक घटना घडली. शिऊर गावातील वैष्णवी योगेश जाधव (वय १७) या तरुणीची अचानक प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात नेण्यात झालेल्या विलंबामुळे तिचा मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री अडीच वाजेदरम्यान ही घटना घडली. विशेष म्हणजे, दहा दिवसांपूर्वीच घरात आजोबांचे निधन झाले होते. आता नातीच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
वैष्णवी ही शिऊर येथील योगेश वसंतराव जाधव यांची मुलगी होती. शनिवारी मध्यरात्री एक वाजता तिची तब्येत अचानक बिघडली. त्यावेळी परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. नातेवाईकांनी तिला शिऊर बंगला येथील खासगी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र खड्यांनी भरलेला रस्ता आणि ओढ्याला आलेल्या पुरामुळे मोठी अडचण निर्माण झाली. परिस्थिती गंभीर असल्याने तिला ट्रॅक्टरमधून नेण्याचा प्रयत्न झाला; पण ट्रॅक्टरही पाण्याच्या प्रवाहात वाहू लागल्याने ग्रामस्थांनी धाव घेतली. दोरीच्या साहाय्याने तिला ओढ्यापलीकडे सुरक्षित पोहोचवण्यात आले.
तरीसुद्धा, फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या रुग्णालयात पोहोचण्यासाठी तब्बल दोन तासांचा विलंब झाला. परिणामी, उपचारापूर्वीच वैष्णवीचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी गावात शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे शिऊर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण मधील सर्व शाळांना २९ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली. हवामान विभागाने संभाव्य पावसाचा इशारा दिल्याने विद्यार्थी, शिक्षक व शालेय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
पैठण शहरात पाणी शिरलं
जायकवाडी धरणातून कालपासून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून, तो वाढवून तब्बल दोन लाख ९२ हजार क्यूसेकपर्यंत करण्यात आला आहे. त्यामुळे पैठण शहरातील अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले आहे. मुख्य बाजारपेठ तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांना रात्रीच दुकाने रिकामी करावी लागली.
प्रशासनाचे आवाहन
गेल्या काही दिवसांतील अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात एकूण सहा जणांचा बळी गेला आहे. जनजीवन विस्कळीत झाल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ii8cI59VTTI77JxAW1zpnq?mode=ems_copy_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*