महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या राज्यव्यापी दौऱ्याचा समारोप छत्रपती संभाजीनगर येथे केला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आपली ठाम भूमिका मांडली. “महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही,” असे त्यांनी पुनः एकदा ठामपणे सांगितले.
सोलापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेनंतर काही माध्यमांतून पसरवण्यात आलेल्या चुकीच्या बातम्यांचा उल्लेख करताना राज ठाकरे म्हणाले, “आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही, मात्र आमचा आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचा आग्रह आहे.” त्यांनी महाराष्ट्रातील साधनसंपत्तीचा योग्य वापर केल्यास आरक्षणाची गरज उरणार नाही, असे स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. “शरद पवारांनी मराठा आरक्षणावर एकही शब्द का नाही टाकला? त्यांनी मनोज जरांगेंच्या आडून विधानसभेचं राजकारण सुरु केलं आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे,” असेही ते म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून त्यांनी सर्व राजकीय पक्षांना लक्ष्य केले. “जर सर्वच पक्ष एकमताने मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे म्हणत असतील, तर ते आरक्षण मागील १५ वर्षांपासून का दिले नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे यांनी आपली भूमिका ठामपणे मांडत इशारा दिला की, “या लोकांनी माझ्या नादी लागू नये. समाजात द्वेष निर्माण करून राजकारण करण्याचा प्रयत्न फसवा आहे.”
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*