छत्रपती संभाजीनगर शहरात नशेच्या पदार्थांचा पुरवठा करणारे एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. मुंबईहून ट्रॅव्हल्सद्वारे शहरात एमडी बटनचा साठा आणला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर एनडीपीएस पथकाने १० ऑगस्ट रोजी पहाटे पंचवटी चौकात मोठी कारवाई केली. या धडक कारवाईत तब्बल २० लाखांचा नशेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पहिल्यांदाच अमली पदार्थांच्या गुन्ह्यात वापरलेली ट्रॅव्हल्स बस देखील पथकाने ताब्यात घेतली आहे.
गुप्त माहितीवरुन सापळा रचला, पेडलर रंगेहात पकडला
एनडीपीएस पथकाच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पंचवटी चौकात पहाटे सापळा रचण्यात आला. यावेळी सना ट्रॅव्हल्सची संशयित बस ठरल्याप्रमाणे चौकात पोहोचली. पथकाने अचूक कारवाई करत, स्थानिक पेडलर सिकंदर खाजा शेख याला बसचालकाकडून पेढ्याचा बॉक्स घेताना रंगेहात पकडले. तपासणीत बॉक्समध्ये ५ ग्रॅम एमडी आणि १०२ बटन गोळ्यांचा साठा सापडला.
मुंबईतून नशेचा माल पाठवणाऱ्या ‘बाजी’चा शोध सुरु
या कारवाईत बसचालक शब्बीर शेख, क्लिनर अफरोजखान, आणि ट्रॅव्हल्स एजंट अझहरखान यांनाही ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशीत आरोपी सिकंदर शेखने मुंबईतील नगमा उर्फ बाजी हिच्याकडून हा माल मिळाल्याचे उघड झाले. बाजीने पेढ्याच्या बॉक्समध्ये नशेचा माल लपवून ट्रॅव्हल्सद्वारे शहरात पाठवण्याचे तंत्र वापरले होते. सध्या पोलिसांकडून बाजीचा शोध घेतला जात आहे.
पहिल्यांदाच ट्रॅव्हल्स बस जप्त, व्यवसायिकांमध्ये खळबळ
या कारवाईत एनडीपीएस पथकाने २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यासोबतच, सना ट्रॅव्हल्स बस देखील ताब्यात घेतली आहे. अमली पदार्थांच्या गुन्ह्यात वाहन जप्त करण्याची ही पहिलीच वेळ असून, यामुळे ट्रॅव्हल्स व्यवसायात मोठी खळबळ उडाली आहे.
ही धडक कारवाई पोलिस आयुक्त प्रविण पवार, उपायुक्त प्रशांत स्वामी, एसीपी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गीता बागवडे आणि त्यांच्या पथकाने केली.