छत्रपती संभाजीनगर : शहरातील मोंढा नाका-जालना रोड परिसरात दिवसाढवळ्या कामगारावर चाकू हल्ला करून चार लाखांची रोकड लुटल्याची तक्रार समोर आल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. मात्र चौकशीदरम्यान या प्रकरणाला मोठे वळण मिळाले असून संपूर्ण लुटीची कथा ही तक्रारदारानेच रचलेली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

फरदीन रफीक शेख (२५, रा. दादा कॉलनी) हा शीतल एजन्सीमध्ये सहा वर्षांपासून काम करत होता. ६ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास तो आपल्या मालकाच्या सांगण्यावरून शहागंज येथून चार लाख रुपये घेऊन दुचाकीने निघाला होता. तनिष्क ज्वेलर्ससमोर मागून आलेल्या दुचाकीस्वारांनी चाकू दाखवून रोकड हिसकावल्याची तक्रार त्याने जिन्सी पोलिस ठाण्यात नोंदवली.

घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र फरदीनच्या जबाबात वारंवार विसंगती आढळल्याने संशय बळावला. कठोर चौकशीदरम्यान अखेर त्याने कबुली देत सांगितले की, तब्बल दीड लाखांचे कर्ज फेडण्यासाठी त्यानेच लूट घडल्याचा खोटा बनाव रचला होता. त्याने आपल्या दोन मित्रांना या योजनेत सामील केले होते. शहागंज येथून रक्कम घेतल्यानंतर जालना रोडवर त्याने सर्व पैसे साथीदारांकडे दिले आणि नंतर पोलिसांकडे बनावट तक्रार दाखल केली.

सहाय्यक निरीक्षक गौतम वावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने हा संपूर्ण कट उघडकीस आणला. पोलिसांनी फरदीन शेखला अटक करून चार लाखांची संपूर्ण रक्कम जप्त केली आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली असून त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,178 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क