स्वराज्य शक्तीसेना पक्ष आता मराठवाड्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘हिरा’ या चिन्हावर लढवणार असल्याची माहिती पक्ष अध्यक्षा करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. “स्वराज्य शक्तीसेना हा हिऱ्यासारखा मजबूत आणि पारदर्शी पक्ष आहे. आमचा लढा विकासाच्या मुद्द्यावर असेल,” असे स्पष्ट करत त्यांनी आगामी निवडणुकांत मोठी तयारी केल्याचे सांगितले.
करुणा मुंडे म्हणाल्या की, राज्यातील बहुतेक प्रस्थापित राजकीय पक्ष जातीय आणि धार्मिक वादाच्या राजकारणात अडकले असून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत. “मतदारांना दोन हजार रूपये, चिकन-मटण यांसारख्या आमिषांनी खरेदी करणारे राजकारण आता बंद झाले पाहिजे. नागरिकांनी आत्मपरीक्षण करून विकास, पायाभूत सुविधा, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन या मुद्द्यांना प्राधान्य दिले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.
त्यांनी सांगितले की स्वराज्य शक्तीसेना मागील तीन वर्षांपासून सक्रिय असून दीड वर्षांपूर्वी पक्षाची अधिकृत नोंदणी झाली. “राज्यात मी स्वबळावर पक्ष स्थापन करणारी पहिली महिला आहे. अजून सर्व जिल्ह्यांत संघटनात्मक बांधणी पूर्ण झाली नसली तरी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत आमची मजबूत उभारणी झाली आहे. नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार आहोत,” असे त्यांनी जाहीर केले.
पुढे बोलताना करुणा मुंडे यांनी काही वर्तमान राजकारण्यांवर टीकास्त्र सोडले. “आमदार गोपीनाथ पडळकर आणि संग्राम जगताप यांसारखे नेते विकासाच्या मुद्द्यांवर बोलत नाहीत, सतत हिंदू-मुस्लिम करत राजकारण ढवळून काढतात. मुख्यमंत्री महोदयांच्या पत्नीने मुस्लिम तरुणासोबत रील केली, तेव्हा हे कुठे गेले होते? समाजात द्वेष पसरवण्याचेच काम हे करतात,” असा आरोप त्यांनी केला.
आपला पक्ष विकासावर ठाम असल्याचे सांगत त्यांनी सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांना पक्षात सहभागी होण्याचे आवाहन केले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*