छत्रपती संभाजीनगर : उपचार सुरू असताना मृत झालेल्या महिला रुग्णाच्या अंगावरील चार तोळे सोन्याचे दागिने रहस्यमयरीत्या गायब झाल्याची धक्कादायक घटना शहरातील जे.जे. प्लस रुग्णालयात उघडकीस आली आहे. या दागिन्यांची किंमत सुमारे चार लाख रुपये असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. रुग्णालयातीलच कर्मचाऱ्यांनी दागिने चोरी केल्याचा गंभीर आरोप मृत महिला बिजलाबाई गायकवाड यांच्या कुटुंबीयांनी केला असून याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप मनोहर गायकवाड (रा. शिवनगर, कन्नड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या आई बिजलाबाई (६३) यांना १३ नोव्हेंबर रोजी घरी असताना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर संदीप आणि त्यांचा भाऊ किरण यांनी त्यांना तातडीने जे.जे. प्लस रुग्णालयात दाखल केले. तब्येत अत्यंत बिघडल्याने त्यांना आयसीयू वॉर्डात हलविण्यात आले. दुपारी उपचारादरम्यान बिजलाबाई यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

निधनाची माहिती मिळाल्यानंतर किरण हे आईला पाहण्यासाठी गेले असता, त्यांच्या अंगावर असलेली सोन्याची साखळी, कानातील टॉप आणि वेल हे दागिने गायब असल्याचे आढळले. काही वेळानंतर पंचनामा करण्यासाठी पोलीस दाखल झाले. त्यावेळी डॉक्टरांनी सोनसाखळीत असलेले गौतम बुद्धांचे १ ग्रॅमचे पेंडल मात्र नातेवाईकांना परत केले. मात्र उर्वरित दागिने कुठेच आढळून आले नाहीत.

कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनाकडे चौकशी केली असता, “सात दिवसांत दागिने परत करू,” असे मौखिक आश्वासन देण्यात आले. मात्र दागिने न मिळाल्याने संशय अधिकच दृढ झाला. आयसीयूच्या वॉचमनकडे चौकशी केली असता, “रुग्णाच्या अंगावर कोणतेही दागिने नव्हते,” असे त्याने सांगितले. नातेवाईकांनी हे सांगणे फेटाळून लावत रुग्णालयातील हाऊसकीपिंग, नर्सिंग व इतर कर्मचाऱ्यांवर गंभीर संशय व्यक्त केला आहे.

रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जीवन राजपूत यांनी, “आम्ही पोलिसांना रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज दिले असून तपासासाठी पूर्ण सहकार्य करत आहोत. रुग्णांनी हॉस्पिटलमध्ये येताना महागडे दागिने आणू नयेत,” असे आवाहन केले.

या प्रकरणाचा पुढील तपास क्रांती चौक पोलीस करत असून सीसीटीव्ही फुटेज आणि कर्मचाऱ्यांच्या चौकशीवरून दागिने कोणी गायब केले याचा तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,031 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क