छत्रपती संभाजीनगर : शहरात पुन्हा एकदा अवैध गोमांस वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. विटावा फाट्यावर शुक्रवारी (५ डिसेंबर) सकाळी सुमारे नऊ वाजता एमएच २० ईएफ ७०२३ या क्रमांकाच्या प्रवासी रिक्षेत मोठ्या प्रमाणात गोमांस वाहतूक करताना गोरक्षकांनी रिक्षा पकडली. या घटनेमुळे परिसरातील वातावरणात तणाव निर्माण झाला. विशेष म्हणजे, घटनेची माहिती मिळाल्यानंतरही पोलिस तब्बल एक तास उशिरा घटनास्थळी पोहोचल्याने गोरक्षकांनी संताप व्यक्त करत रस्ता रोको आंदोलन छेडले. त्यामुळे तासाभर वाहतूक ठप्प झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही रिक्षा अंबेलोहळ परिसरातून गोमांसाच्या गोण्या घेऊन शहराकडे येत होती. गोरक्षकांनी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाठलाग करून रिक्षा अडवण्यात आली. रिक्षामध्ये हबीब हाशम शेख (३८) आणि कमरू जलाल सय्यद (५६) आढळून आले. संतप्त गोरक्षकांनी रिक्षाचालकाला मारहाण करत रिक्षातील गोमांस रस्त्यावर फेकत निषेध नोंदवला.

पोलिस उशिरा पोहोचल्यामुळे परिस्थिती अधिक चिघळली. अखेर ११२ च्या व्हॅनने आरोपींना ताब्यात घेऊन एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात हलवण्यात आले. मात्र, कारवाईच्या मागणीवर ठाम भूमिका घेत गोरक्षकांनी अवैध कत्तलखाने आणि गोमांस व्यवसायावर तातडीने बंदोबस्ताची मागणी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

गेल्या दोन महिन्यांपासून शहरात अवैध गोवंश वाहतूक आणि गोरक्षकांमधील संघर्ष वाढत असून, पोलिसांची निष्क्रियता हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,268 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क