छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया मंगळवार (दि. २३) म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज विक्री व स्वीकारण्यात येणार आहे. उमेदवारी अर्जाची किंमत १०० रुपये असून, त्यासोबत माहिती पुस्तिकेसाठीही १०० रुपये भरावे लागणार आहेत.
महापालिकेच्या २९ प्रभागांसाठी एकूण ९ निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आले असून, पाच झोन कार्यालयांसह शहरातील इतर चार ठिकाणी ही कार्यालये कार्यरत राहणार आहेत. या कार्यालयांसाठी आवश्यक स्टेशनरी सोमवारी पुरविण्यात आली आहे. झोन कार्यालयातील कर्मचारी तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडील कर्मचारी अर्ज प्रक्रिया हाताळणार आहेत. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्रत्येकी ३०० असे एकूण २७०० उमेदवारी अर्ज वितरित करण्यात आले आहेत.
शासकीय सुटी वगळून ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. निवडणूक लढविणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पाच हजार रुपये, तर महिला व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५०० रुपये अनामत रक्कम (डिपॉझिट) भरावी लागणार आहे.
दरम्यान, निवडणूक प्रक्रियेसाठी वाहतूक व्यवस्थेचेही नियोजन सुरू करण्यात आले आहे. मतदान केंद्रांवर पोलिंग पार्टी पोहोचविणे व मतदानानंतर त्यांना परत आणण्यासाठी सुमारे २०० बस आणि ३०० जीप वापरण्यात येणार आहेत. यामध्ये स्मार्ट सिटीच्या ६० बस आणि एसटी महामंडळाच्या १४० बसचा समावेश असेल. या संदर्भात महापालिकेच्या यांत्रिकी विभागाने तयारी सुरू केली आहे.
शहरातील विविध झोन कार्यालये, स्मार्ट सिटी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, आयटी पार्क, क्रीडा संकुल व इतर ठिकाणी प्रभागनिहाय उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याने इच्छुक उमेदवारांना सोयीस्कर ठिकाणी अर्ज भरता येणार आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून, आगामी दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग वाढणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GlraBleBDXk4TRi1fKkvIy
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*