छत्रपती संभाजीनगर : “नात्यातलं चांगलं स्थळ आहे, आता सोडून कसं चालेल?” या एकाच विचारातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादजवळील देवळाना शिवारात एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्याची तयारी सुरू होती. मात्र, अक्षता पडण्यापूर्वीच ग्रामीण पोलिसांच्या दामिनी पथकाने वेळेवर हस्तक्षेप करत या बालविवाहाला आळा घातला आणि एका निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले.

पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवळाना शिवारात अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार दामिनी पथकाच्या प्रमुख एपीआय सरला गाडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा अंगणात मांडव उभारलेला होता, नातेवाईकांची लगबग सुरू होती आणि अल्पवयीन मुलगी नवरीच्या वेशात लग्नासाठी सज्ज होती.

पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत मुलीची शैक्षणिक कागदपत्रे तपासली. तपासणीत तिचे वय अवघे १६ वर्षे ९ महिने असल्याचे स्पष्ट झाले. मुलीचे वय कायदेशीर विवाहासाठी अपुरे असतानाही केवळ नात्यातील स्थळ असल्याने पालकांनी लग्नाची घाई केल्याचे समोर आले.

यावेळी दामिनी पथकाने पालकांचे खडक शब्दांत समुपदेशन केले. बालविवाह हा गंभीर गुन्हा असून, यासाठी दोन वर्षांपर्यंत सक्तमजुरी व दोन लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याची माहिती देण्यात आली. “ज्या वयात हातात पुस्तके असायला हव्यात, त्या वयात संसाराची जबाबदारी देणे म्हणजे तिचे भविष्य धोक्यात घालणे,” असे स्पष्ट शब्दांत पोलिसांनी समजावले.

समुपदेशनानंतर पालकांनी आपली चूक मान्य केली. मुलगी सज्ञान होईपर्यंत तिचा विवाह करणार नाही, असे लेखी आश्वासन त्यांनी पोलिसांना दिले. या तत्पर कारवाईमुळे एका अल्पवयीन मुलीला शिक्षण सुरू ठेवण्याची आणि उज्ज्वल भविष्यासाठी पुढे जाण्याची नवी संधी मिळाली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/GlraBleBDXk4TRi1fKkvIy

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,080 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क