छत्रपती संभाजीनगर : मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकवल्याची भीती दाखवून ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली गारखेडा परिसरातील ५३ वर्षीय गृहिणीची तब्बल २५ लाख ८७ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई क्राइम ब्रँच व ईडीचे अधिकारी असल्याचा बनाव करून सायबर भामट्यांनी या महिलेला सहा दिवस व्हिडिओ कॉलवर नजरकैदेत ठेवत तिची आयुष्यभराची पुंजी लंपास केली.
१६ डिसेंबर रोजी महिलेला फोन करून तुमच्यावर छळवणूक व बेकायदेशीर जाहिरातीसंदर्भात गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आधार कार्डद्वारे मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप करत, आरोपीने तुमचे नाव घेतले असल्याचे सांगून महिलेला घाबरवण्यात आले. चोरट्यांनी व्हॉट्सअॅपवर बनावट अटक वॉरंट व ईडीच्या नोटिसा पाठवत, “२४ तास आमच्या व्हिडिओ कॉल सर्व्हिलन्सवर राहा. कॅमेरा बंद केला किंवा कोणाशी बोललात तर घरावर धाड टाकून गोळीबार करू,” अशी गंभीर धमकी दिली.
या दहशतीमुळे महिलेला कोणालाही माहिती देता आली नाही. सुरुवातीला गुगल पे द्वारे ४६ हजार व ५४ हजार रुपये उकळण्यात आले. त्यानंतर बँक खात्यांची माहिती घेऊन बँक ऑफ बडोदामधील ६.५० लाखांची व एयू स्मॉल फायनान्स बँकेतील ५ लाखांची एफडी मुदतपूर्व मोडून आरटीजीएसद्वारे रक्कम वेगवेगळ्या खात्यांत पाठवण्यास भाग पाडले. सहा दिवसांत टप्याटप्याने एकूण २५.८७ लाख रुपये चोरट्यांनी उकळले.
गोळीबाराच्या धमकीमुळे महिलेने हा प्रकार पतीपासूनही लपवून ठेवला. मात्र २२ डिसेंबर रोजी पतीने विचारणा केल्यानंतर संपूर्ण प्रकार उघड झाला. दरम्यान, एवढ्या मोठ्या रकमेचे व्यवहार होत असताना बँकांकडून कोणतीही चौकशी न झाल्याबद्दल फिर्यादीने खंत व्यक्त केली आहे.
सायबरतज्ज्ञ तन्मय दीक्षित यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संशयास्पद कॉल आल्यास नंबरचा स्क्रीनशॉट घ्यावा, स्क्रीन रेकॉर्ड करावे आणि कोणतीही माहिती देऊ नये. सायबर फसवणूक ‘गोल्डन पीरियड’मध्ये पोलिसांना कळवल्यास रक्कम परत मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GlraBleBDXk4TRi1fKkvIy
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*