छत्रपती संभाजीनगर : दारूच्या व्यसनामुळे जालना येथून छत्रपती संभाजीनगर शहरात येऊन रात्री रस्त्यावर मुक्काम ठोकत सकाळी परत जाताना दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यासह त्याच्या साथीदाराला गुन्हे शाखेने महिनाभरात दुसऱ्यांदा अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १४ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. कृष्णा नारायण मुरडकर (वय २७, रा. वालसावंगी, ता. भोकरदन, जि. जालना) आणि अरुण धनराज कांडेलकर (वय १९, रा. गोंडखेड, ता. जामनेर, जि. जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त रत्नाकर नवले यांनी बुधवारी (दि. २४) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा मुरडकर हा दारूच्या आहारी गेलेला सराईत गुन्हेगार असून तो सिडको व हर्सूल भागात फिरून दुचाकी चोरीचा सपाटा लावत होता. विशेष म्हणजे, अवघ्या महिनाभरापूर्वीच २१ नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखेचे एपीआय रविकांत गच्चे यांनी त्याला अटक करून चार दुचाकी जप्त केल्या होत्या. जामिनावर सुटताच त्याने पुन्हा चोरीचे सत्र सुरू केले.

गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या सूचनेनुसार एपीआय गच्चे यांच्या पथकाने सापळा रचून कृष्णा मुरडकर याला अटक केली. चौकशीत त्याने चोरी केलेल्या दुचाकी जळगाव येथील अरुण कांडेलकरमार्फत मजुरांना अवघ्या दोन ते तीन हजार रुपयांत विकल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक करून १४ चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या.

कृष्णा मुरडकर याच्यावर बुलढाणा, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चोरी, जुगार व लूटमारचे एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. २०२१ मध्येही सिडको पोलिसांनी त्याला दुचाकी चोरीप्रकरणी अटक करून तीन दुचाकी जप्त केल्या होत्या.

ही यशस्वी कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रविकांत गच्चे, सहायक फौजदार दिलीप मोदी, हवालदार प्रकाश गायकवाड, शेख नवाब, अश्रफ सय्यद, अमोल शिंदे व सोमनाथ डूकळे यांनी केली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/GlraBleBDXk4TRi1fKkvIy

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,470 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क