छत्रपती संभाजीनगर : देवदर्शनाच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या एका पतंग विक्रेत्या तरुणाने तिकडेच नायलॉन मांजाची तस्करी सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंदूर (मध्यप्रदेश) येथून कुरियरद्वारे आणलेला मांजाचा मोठा साठा गुन्हे शाखेने पकडून दोन तरुणांना अटक केली असून, त्यांच्याकडून २८८ गट्टू (चक्री) जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ डिसेंबर रोजी पदमपुरा परिसरात ही कारवाई करण्यात आली.
ऋतिक दिलीप लोधे (२२, रा. बन्सीलालनगर) आणि गणेश रामकिसन औताडे (२२, रा. धेरडा, ता. गंगापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच या तस्करीत इंदूर येथील नासेर नामक व्यापाऱ्याचाही सहभाग असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली. आरोपी ऋतिक हा पतंग विक्रीचा व्यवसाय करीत असून, त्यानेच नायलॉन मांजाची तस्करी सुरू केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मंगळवारी एका कुरियरद्वारे मांजाचे पार्सल आल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. हे पार्सल चारचाकी वाहनातून वाहतूक केली जात असल्याचे समजताच पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार कैलास काकड, विजय निकम, मनोज विखणकर, बाळू नागरे, विजय घुगे, प्रमोद सुरसे, सागर साळवे आणि अक्षय नाटकर यांच्या पथकाने पदमपुरा भागात सापळा रचला. कार थांबवून तपासणी केली असता सहा गोण्यांमधून २८८ गट्टू नायलॉन मांज्या आढळून आला.
तपासादरम्यान आरोपी ऋतिक याने दोन महिन्यांपूर्वी खाटूश्याम येथे देवदर्शनासाठी गेल्याची कबुली दिली. त्यानंतर नायलॉन मांज्या मिळवण्यासाठी तो सुरतला गेला, मात्र तेथे संपर्क न झाल्याने इंदूर येथील नासेरशी त्याची ओळख झाली. नासेरसोबत व्यवहार करून त्याने कुरियरमार्फत मांज मागवला होता. गुन्हे शाखेने जप्त केलेल्या या मांजाची किंमत सुमारे १ लाख ९० हजार ६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास सुरू असून तस्करीच्या नेटवर्कचा शोध घेतला जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GlraBleBDXk4TRi1fKkvIy
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*