छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी अवघे सहा दिवस शिल्लक राहिले असून शहरातील निवडणूक वातावरण चांगलेच तापले आहे. येत्या १५ जानेवारी रोजी शहरातील एकूण १२६७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान संपल्यानंतर लगेचच रात्री सर्व ईव्हीएम चार वेगवेगळ्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ जानेवारी रोजी सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्रांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या महापालिका निवडणुकीत एकूण ११५ जागांसाठी तब्बल ८५९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्रचाराची रणधुमाळी थांबणार असून त्यानंतर उमेदवारांची धावपळ मतदारांपर्यंत पोहोचण्यावर केंद्रीत होणार आहे. एकीकडे राजकीय पक्ष आणि उमेदवार जोरदार प्रचारात गुंतलेले असताना, दुसरीकडे प्रशासनाकडूनही निवडणुकीसाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी गुरुवारी ९ निवडणूक अधिकाऱ्यांच्या ताब्यात ईव्हीएम आणि कंट्रोल युनिट देण्यात आले आहेत. यावेळी संभाव्य अडचणी टाळण्यासाठी प्रशासनाने २० टक्के अतिरिक्त ईव्हीएम आणि कंट्रोल युनिट उपलब्ध करून दिले आहेत. या निवडणुकीसाठी सुमारे ४ हजार ईव्हीएम आणि २ हजार कंट्रोल युनिट वापरण्यात येणार आहेत.
गरवारे स्टेडियम, सेंट फ्रान्सिस हायस्कूल, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय या चार ठिकाणी स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. मतमोजणीच्या दिवशी प्रत्येक केंद्रासाठी स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.
गरवारे स्टेडियम येथे प्रभाग क्रमांक १,२,७,८,९,१०,११,२३,२४,२५ यांची मतमोजणी होणार आहे. सेंट फ्रान्सिस हायस्कूल येथे ३,४,५,६,१२,१३,१४, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात १८,१९,२०,२१,२२,२७ तर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात १५,१६,१७,२६,२८,२९ या प्रभागांची मतमोजणी पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*