छत्रपती संभाजीनगर : मतदान ही केवळ मतदान केंद्रावर जाऊन ईव्हीएमचे बटण दाबण्याची प्रक्रिया नसून, त्या एका बटणामागे प्रचंड नियोजन, काटेकोर तयारी आणि प्रशासनाची महिन्यांची मेहनत असते. मतदारांना एक दिवस मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोग आणि महापालिका प्रशासनाला तब्बल १०१ प्रकारच्या साहित्याची व्यवस्था करावी लागते. टाचणी, खोडरबर, पेन, कागदपत्रांपासून ते ईव्हीएम यंत्रांपर्यंत प्रत्येक गोष्ट योग्य वेळी, योग्य ठिकाणी पोहोचणे अत्यावश्यक असते.

या संपूर्ण तयारीसाठी निवडणूक आयोग व महापालिकेचा भांडार विभाग तब्बल ९० दिवसांपासून अहोरात्र काम करत आहे. मतदानाच्या दिवशी कोणत्याही वस्तूचा तुटवडा भासू नये, यासाठी मागणीपेक्षा सुमारे २० टक्के अधिक साहित्य राखीव ठेवण्यात येते. ही खबरदारी म्हणजे निवडणूक व्यवस्थेतील अनुभवाचे आणि शिस्तीचे दर्शन घडवणारी बाब ठरते.

मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी खास पांढऱ्या रंगाची कापडी पिशवी तयार करण्यात आली आहे. या पिशवीवर लाल अक्षरात ‘छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक मतदान केंद्र क्र.’ असे छापलेले असते. कार्ड तुकडे, कार्बन पेपर, रायटिंग पेपर, स्केल, पडताळणी सूची, चुना आदी साहित्य याच पिशवीतून मतदान केंद्रावर नेले जाते.

प्रत्येक मतदान केंद्रात स्टेशनरीचा स्वतंत्र डबा दिला जातो. यात निळे व लाल बॉलपेन, टाचण्या, पिन पॉकेट, पेन्सिल, शॉपनर, खोडरबर, रबर बँड, खडू, आगपेटी, सेलोटेप, कटर, स्केच पेन, मेणबत्ती, दोरा, शाई पुसण्याचे कापड, शाईचे पॅड आदी २१ वस्तूंचा समावेश असतो. काहीही विसरू नये म्हणून हे साहित्य पारदर्शक प्लास्टिकच्या डब्यात ठेवले जाते.

ईव्हीएम सीलबंद करण्यासाठी विशिष्ट जोडदोरा व लाख वापरण्यात येते. मतदार यादी, प्रदत्त मतांची नोंद, घोषणापत्रे, मतदान टक्केवारी तक्ता, दुबार मतदारांचे हमीपत्र अशा प्रत्येक कागदपत्रातून पारदर्शक निवडणुकीचा ठोस पुरावा निर्माण होतो. त्यामुळे एक बटण दाबण्यामागे प्रशासनाच्या सूक्ष्म नियोजनाची मोठी यंत्रणा कार्यरत असल्याचे स्पष्ट होते.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,044 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क