छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवार, दि. १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून यासाठी प्रशासनाने कडक नियमावली लागू केली आहे. या निवडणुकीत एकूण ८५९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदानाच्या दिवशी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे, असे स्पष्ट निर्देश पोलिस प्रशासन व मनपा प्रशासनाने दिले आहेत.
स्मार्ट सिटी कार्यालयात शुक्रवारी दुपारी पोलिस प्रशासन आणि विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, मनपा प्रशासक जी. श्रीकांत, निवडणूक विभागप्रमुख विकास नवाळे, कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, सहायक आयुक्त ऋतुजा पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत माहिती देताना पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितले की, मतदानाच्या दिवशी उमेदवाराला कोणत्याही मतदान केंद्रावर दिवसभरात केवळ तीन वेळाच भेट देता येईल. यापेक्षा अधिक फेऱ्या मारण्यास मनाई राहील. तसेच मतदान केंद्रातील कक्षात उमेदवार किंवा प्रतिनिधी फक्त तीन मतदारांना मतदानासाठी जितका वेळ लागेल, तेवढ्याच वेळासाठी थांबू शकतील.
महत्त्वाचा निर्णय घेत मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल वापरण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधिताचा मोबाईल जप्त करण्यात येणार आहे. याशिवाय मतमोजणी केंद्रांवर जागेची मर्यादा लक्षात घेता, नोंदणीकृत राजकीय पक्षांनी प्रत्येक पॅनलसाठी एकच प्रतिनिधी नियुक्त करावा, असे मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उमेदवारांच्या मागणीनुसार प्रचार रॅली, सभा किंवा अन्य कार्यक्रमांसाठी आवश्यक तो पोलिस बंदोबस्त पुरवण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. मात्र एअर बलून किंवा ड्रोनचा वापर पोलिस परवानगीशिवाय करता येणार नाही. १४ जानेवारी रोजी मकर संक्रांत असल्याने नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
त्याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन असल्याने कार्यक्रमस्थळी कोणताही राजकीय प्रचार, भेटवस्तूंचे वितरण किंवा बॅनर लावण्यास मनाई करण्यात आली आहे. बैठकीदरम्यान उमेदवारांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचे निरसनही प्रशासनाकडून करण्यात आले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*