छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी, यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे. येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, या पार्श्वभूमीवर मनपा, पोलिस आणि संबंधित यंत्रणांकडून काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेसाठी जवळपास एक हजार वाहनांचे नियोजन करण्यात आले असून, १३ जानेवारीच्या रात्रीपासून ही वाहने ताब्यात घेण्यास सुरुवात होणार आहे.

निवडणूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी प्रत्येक वाहनाला जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. मंगळवारपासून जीपीएस बसविण्याचे काम सुरू होणार असून, एकही वाहन विना जीपीएसचे राहणार नाही, अशी माहिती मनपाच्या यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांनी दिली. या माध्यमातून वाहनांच्या हालचालींवर थेट नियंत्रण ठेवता येणार आहे.

मतदानाच्या दिवशी बंदोबस्तासाठी बाहेरून एसआरपी, होमगार्डसह जवळपास तीन हजार पोलिस कर्मचारी मागविण्यात येणार आहेत. काही संवेदनशील प्रभागांत तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. दोन वेगवेगळे पक्ष समोरासमोर येणे, वाद, भांडणे अथवा हाणामारीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी सूक्ष्म नियोजन सुरू करण्यात आले आहे.

वाहन व्यवस्थापनासाठी महापालिकेच्या यांत्रिकी विभागाने स्वतंत्र आराखडा तयार केला आहे. परिवहन मंडळाकडून ९० बसेस, स्मार्ट सिटीच्या ६३ बसेस वापरण्यात येणार आहेत. याशिवाय १२० क्रुझर जीप भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या असून, क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी १६० जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. विविध शासकीय कार्यालयांकडून ७५ चारचाकी वाहने अधिग्रहित करण्यात आली आहेत. वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपातील नऊ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलिस बंदोबस्तासाठी आवश्यक २०० जीप व १३० टेम्पो भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असून, त्याचे भाडे महापालिका प्रशासन अदा करणार आहे. निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे चित्र आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

441 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क