छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या मतदान व निकालाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १४, १५ आणि १६ जानेवारी या तीन दिवसांसाठी संपूर्ण शहरात ‘ड्राय डे’ जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत महानगरपालिका हद्दीतील सर्व परवानाधारक वाइन शॉप, बार तसेच देशी दारू विक्री करणारी आस्थापने पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारी रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यापूर्वी १३ जानेवारी रोजी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावतील. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत शहरात राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण तापले होते. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने शहरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला आहे. दंगा नियंत्रण पथकांसह एसआरपीएफची वाढीव कुमकही मागविण्यात आली आहे.

‘ड्राय डे’च्या अंमलबजावणीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष पथके तैनात केली आहेत. एका निवडणूक अधिकाऱ्यासह एक पोलिस निरीक्षक, तीन उपनिरीक्षक आणि सात अंमलदारांचा समावेश असलेली तीन पथके शहरात गस्त घालणार आहेत. या कालावधीत अवैध दारू विक्री, ढाबे व हॉटेलमध्ये मद्यसेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

रविवारी गोव्याहून शहरात आणलेली प्रतिबंधित दारू जप्त करून दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध दारू विक्री व तस्करी करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अभिनव बालुरे यांनी सांगितले. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, ‘ड्राय डे’चे आदेश केवळ महानगरपालिका हद्दीपुरते मर्यादित असल्याने शहरालगतच्या ग्रामीण भागातून दारू तस्करी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून शहर व उपनगरांमध्ये विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

827 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क